उजनी जलाशयात मत्स्य बोटुकली संचयनासाठी ६० लक्ष निधीस मंजुरी माजी आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीमधून उजनी जलाशयामध्ये मत्स्य बोटुकली संचयन करण्यासाठी ६० लक्ष रुपयांच्या निधीस मंजुरी देण्यात आल्याची माहिती माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली. सदर मंजुरी ही सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत देण्यात आली असून, पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या सूचनेनुसार या कामास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना माजी आमदार शिंदे म्हणाले की, मे २०२५ मध्ये त्यांनी उजनी जलाशयात मत्स्य बोटुकली संचयनासाठी १ कोटी ५० लक्ष रुपयांच्या निधीची मागणी पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्याकडे केली होती. त्या मागणीस यश येत उजनी जलाशयासाठी ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
उजनी जलाशय हे राज्यातील मत्स्य व्यवसायासाठी अग्रगण्य जलाशय असून, विविध जाती-धर्मातील नागरिक येथे मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करतात. मात्र जलसंपदा विभागाकडे मत्स्यबीज संचयनासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद नसल्यामुळे गेल्या २७ ते २८ वर्षांपासून उजनी जलाशयात मत्स्यबीज संचयन झालेले नव्हते. यामुळे कार्पसह अनेक जातींच्या माशांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती.
महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीने उजनी जलाशयात मत्स्यबीज सोडण्याची मागणी केली होती. जलाशयाच्या सिंचन क्षमतेनुसार मत्स्यबीज खरेदीसाठी १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी विनंती माजी आमदार शिंदे यांनी केली होती.
या मागणीस यश येत उजनी जलाशयासाठी ६० लक्ष रुपये तसेच बार्शी तालुक्यातील जवळगाव मध्यम प्रकल्पासाठीही मत्स्य बोटुकली संचयनाकरिता ६० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी २०१९ ते २०२४ या कालावधीत आमदार असताना संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून २ कोटी रुपयांचा निधी मत्स्य बोटुकली संचयनासाठी मंजूर झाला होता.
माजी आमदार असतानाही त्यांच्या प्रयत्नातून पुन्हा निधी उपलब्ध झाल्याबद्दल महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समितीने माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे आभार मानले आहेत.


