स्व. दादासाहेब गायकवाड यांच्या विचारांची मशाल हाती घेऊन आशिष गायकवाड यांची विकासक्रांतीकडे दमदार वाटचाल –पत्रकार दिनेश मडके
करमाळा प्रतिनिधी : स्वर्गीय दादासाहेब गायकवाड यांच्या सामाजिक विचारांची मशाल हाती घेत युवा नेते आशिष भैया गायकवाड विकासाभिमुख राजकारणाची दमदार वाटचाल करत आहेत, असे गौरवोद्गार करमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके यांनी काढले.
आशिष गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमास संघटनेचे सचिव नरेंद्रसिंह ठाकूर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान करण्याच्या भावनेतून हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
दिनेश मडके म्हणाले की, समाजकारणातूनच खरे आणि सक्षम राजकीय नेतृत्व घडते. जनतेचे प्रश्न समजून घेऊन त्यावर ठोस पाठपुरावा करणे, युवकांना दिशा देणे आणि समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे हेच लोकनेतृत्वाचे खरे मर्म आहे. केवळ पद धारण करणे नव्हे, तर कामातून विश्वास जिंकणे अधिक महत्त्वाचे आहे. जनतेशी जिव्हाळ्याचे नाते राखणारे नेतृत्वच समाजाच्या मनात कायमचे स्थान निर्माण करते, असे त्यांनी स्पष्ट केले.
मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक आशिष भैया गायकवाड यांनी आपल्या वडिलांच्या कार्यशैलीचा आदर्श ठेवत समाजकारणातून राजकारणात प्रवेश केला. कोर्टी जिल्हा परिषद गट व केत्तूर पंचायत समिती गणातील यश हे त्यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्क, संघटनकौशल्य आणि विकासाभिमुख दृष्टिकोनाचे फलित असल्याचे नमूद करण्यात आले. ग्रामीण भागातील पाणी, रस्ते, शिक्षण, शेती आणि युवकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवत विकासकामांना गती दिली आहे.
सत्काराला उत्तर देताना आशिष भैया गायकवाड यांनी समाजसेवा हेच आपले ध्येय असल्याचे सांगितले. जनतेच्या प्रश्नांसाठी ठाम राजकीय भूमिका घेत भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. विविध मान्यवरांनी शुभेच्छा देत सामाजिक भान असलेले नेतृत्व समाजाला नवी दिशा देईल, असा विश्वास व्यक्त केला.
वाढदिवसानिमित्त केवळ औपचारिकता न ठेवता समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संदेश देत कार्यक्रम सामाजिक एकात्मतेचे प्रतीक ठरला आहे.


