शासकीय कामकाजाचे प्रत्यक्ष धडे! ‘नामसाधना’च्या चिमुकल्यांनी स्वतः अर्ज लिहून मांडल्या समस्या; मुख्याधिकाऱ्यांकडून कौतुक
करमाळा (प्रतिनिधी):
विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता त्यांना लहानपणापासूनच दैनंदिन जीवन, प्रशासकीय कामकाज, शासकीय प्रक्रिया आणि सर्वसामान्य ज्ञानाचे प्रत्यक्ष अनुभव मिळायला हवेत, या उद्देशाने नामसाधना मॉडर्न स्कूल चा एक अतिशय आगळावेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम नुकताच पार पडला. शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतः हाताने अर्ज लिहून करमाळा नगरपालिकेत जात मुख्याधिकारी (सीओ) सचिन तपसे यांची भेट घेतली आणि आपल्या समस्या मांडल्या.
गेल्या काही दिवसांपूर्वी नामसाधना मॉडर्न स्कूलमध्ये पालकांची व शिक्षकांची एक विशेष बैठक पार पडली होती. ही बैठक करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त शंभूराजे जयवंतराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी महात्मा गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळकृष्ण पाटील सर, उपमुख्याध्यापक श्री. अनिस बागवान सर, नामसाधना मॉडर्न स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. सीमा कोरडे मॅडम आणि मोठ्या संख्येने हुशार व अभ्यासू पालक उपस्थित होते.
या बैठकीत अध्यक्षीय भाषणात विश्वस्त शंभूराजे जगताप यांनी प्रतिपादन केले की, “विद्यार्थ्यांना केवळ वर्गात बसवून शिकवण्यापेक्षा प्रशासकीय, शासकीय कामकाज आणि सामाजिक जाणिवेचे धडे लहानपणापासूनच मिळणे गरजेचे आहे. यामुळे मुलांमध्ये नागरिक म्हणून जबाबदारीची भावना निर्माण होईल.”
याच विचारांचे औचित्य साधून मुख्याध्यापिका सीमा कोरडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रशासकीय कामकाजाची ओळख व्हावी म्हणून एक अनोखी कल्पना मांडली. शाळेत निर्माण झालेल्या अस्वच्छतेची व डासांची समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः नगरपालिकेला अर्ज करावा, जेणेकरून त्यांना नगरपालिकेचे कामकाज कसे चालते याची माहिती मिळेल. तसेच भविष्यात विद्यार्थ्यांना अशाच प्रकारे वेगवेगळ्या शासकीय व प्रशासकीय कार्यालयांना भेटी देऊन तिथल्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती दिली जाईल, असेही कोरडे मॅडम यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमांतर्गत आज नामसाधना मॉडर्न स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी करमाळा नगरपालिकेत जाऊन चीफ ऑफिसर (सीओ) मा. सचिन तपसे साहेब यांची भेट घेतली. विद्यार्थ्यांनी स्वतः अतिशय आपुलकीने आणि कौशल्याने लिहिलेला अर्ज सीओ साहेबांच्या हाती सोपवला व शाळेतील कचरा गाडी आणि स्वच्छतेबाबतच्या अडचणी मांडल्या.
मुख्याधिकारी सचिन तपसे यांनी सर्व लहान विद्यार्थ्यांचे अत्यंत उत्साहाने व कौतुकाने स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना करमाळा नगरपालिकेचे शासकीय कामकाज कसे चालते, कचरा व्यवस्थापन कसे होते आणि एका जबाबदार नागरिकाचे हक्क व कर्तव्ये कोणती असतात, हे सोप्या भाषेत समजावून सांगितले.
लहान वयातच विद्यार्थ्यांना प्रशासकीय प्रक्रियेशी जोडणाऱ्या आणि त्यांच्यात नागरिक शास्त्राची आवड निर्माण करणाऱ्या नामसाधना मॉडर्न स्कूलच्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे करमाळा शहरात सर्वत्र कौतुक होत आहे.


