अंगणवाडी ताईंसाठी ‘जनशक्ती’ मैदानात मागण्या मान्य नं झाल्यास मंत्रालयात घुसण्याचा अतुल खुपसेचा इशारा
करमाळा प्रतिनिधी चिमुकल्यावर चांगले संस्कार व्हावे, देशाची पिढी चांगली घडावी यासाठी अंगणवाडीच्या मदतनीस आणि सेविका मोठे कष्ट घेत असतात. या कामासह त्यांना अनेक शासकीय कामे लावली जातात असे असताना राज्य व केंद्र सरकार या अंगणवाडीताईंवर जाणून बुजून अन्याय करत आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात अन्यथा राज्यातील हजारो अंगणवाडीताईंना घेवून जनशक्ती संघटना मंत्रालयात घुसेल असा इशारा जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी देत सोलापूर जिल्हा परिषदेच्या बाहेर अंगणवाडी मदतनीस व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला.
” अभी नही तो कभी नही ” मनात सोलापूर जिल्हा परिषदेच्या बाहेर सोलापूर जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी मदतनीस, सेविका व मिनी सेविका यांचे आंदोलन झाले. या आंदोलनालाजनशक्ती संघटनेने पाठिंबा दर्शविला. या वेळी अतुल खूपसे पाटील बोलत होते.
जोपर्यंत मानधन वाढीचा जी.आर निघत नाही तोपर्यंत आंदोलने करायची आहेत. मानधन वाढीचा जीआर लवकर निघाला पाहिजे, नवीन मोबाईल मिळाला पाहिजे, पोषण ट्रॅक ची सक्ती बंद झाली पाहिजे, डेटा इंट्री ची सक्ती बंद झाली पाहिजे, आहार शिजवून देण्यासाठी इंधनाचे पैसे वाढवून मिळाले पाहिजे, रिचार्ज चे पैसे वाढवून मिळाले पाहिजे, प्रशासकीय खर्च रुपये ५ हजार वाढवून दिले पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युईटी दिली पाहिजे, महागाई भत्ता मिळाला पाहिजे या व इतर मागण्यांसाठी हा मोर्चा आयोजित केला आहे.
यावेळी राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, जिल्हा सरचिटणीस सरला चाबुकस्वार यांनी मनोगत व्यक्त करत न्याय देण्याची मागणी केली.
