करमाळा शहराच्या विकासासाठी भाजप नगरसेविका सौ स्वातीताई फंड यांचे पाच महत्त्वाचे प्रस्ताव सर्वसाधारण सभेत चर्चेची मागणी
*
करमाळा प्रतिनिधी
शहराच्या सौंदर्यवर्धनासह मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी महत्त्वाचे पाच विकास प्रस्ताव आगामी सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर समाविष्ट करावेत, अशी मागणी भाजप नगरसेविका स्वातीताई फंड सामाजिक कार्यकर्ते महादेव फंड यांनी केली आहे. करमाळा नगरपरिषदच्या सर्वसाधारण सभेत या विषयांवर सविस्तर चर्चा होऊन निर्णय घ्यावा, यासाठी नगरसेविका सौ. स्वाती महादेव फंड यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, करमाळा शहराच्या चारही प्रमुख प्रवेशमार्गांवर – पुणे रोड, नगर रोड, सोलापूर रोड व कुईवाडी रोड – भव्य स्वागत कमानी उभारण्यात याव्यात. शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच करमाळ्याची स्वतंत्र ओळख निर्माण होण्यासाठी या कमानी उपयुक्त ठरतील. शहरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत आकर्षक पद्धतीने व्हावे, हा या मागणीमागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तसेच शहरातील सात विहीर परिसरात दहाव्याच्या विधीसाठी स्वतंत्र घाट उभारण्याची मागणी करण्यात आली आहे. या ठिकाणी दोन खोल्या बांधून पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहांची व इतर आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था करावी, असे निवेदनात नमूद आहे. सध्या सुविधांच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याने हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे.
प्रभाग क्र. ४ मध्ये विविध सार्वजनिक ठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी बाकडे बसविण्याचाही प्रस्ताव देण्यात आला आहे. सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना बसण्याची सोय व्हावी, तसेच सामाजिक संवादासाठी योग्य जागा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, जैन स्मशानभूमीत महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करून त्यावर शेड उभारण्यात यावे. अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांना उन्हाळा व पावसाळ्यात त्रास सहन करावा लागू नये, यासाठी ही सुविधा आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर स्मशानभूमीत विद्युत वाहिनी उभारून प्रकाशव्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
वरील सर्व विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंड्यावर घेऊन त्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. या प्रस्तावांबाबत सभेत काय निर्णय होतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे


