करमाळा शहर विकासासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करमाळा शहर विकास आघाडीच्यावतीने भरीव निधीची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव निधी मंजूर करावा, या मागणीसाठी करमाळा शहर विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेतली.
सावंत गटाचे गटनेते मा. श्री. सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली मा. श्री. संजय सावंत, हुमरान मुलाणी, दादा इंदलकर, सुनील लुणिया, रवि जाधव, संदीप कांबळे, अमोल परदेशी, स्वीकृत नगरसेवक सिद्धेश लावंड व विनोद महानवर हे उपस्थित होते.
या भेटीत शहरातील प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी करण्यात आली. पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणा, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, स्वच्छता व्यवस्था मजबूत करणे, तसेच हद्दवाढीनंतर नव्याने समाविष्ट भागांत मूलभूत सुविधा उभारण्यासाठी विशेष निधी देण्याची आवश्यकता यावेळी मांडण्यात आली.
करमाळा शहराचा नियोजनबद्ध व वेगवान विकास व्हावा, यासाठी शासन स्तरावरून तातडीने सहकार्य मिळावे, अशी भूमिका सावंत गटाने स्पष्ट केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले आहे.


