Saturday, November 21, 2026
Latest:
Uncategorized

चार हजार ऊसदरासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर एल्गार राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली कुंभेज फाट्यावर रास्ता रोको; नऊ मागण्यांसाठी शासनाला इशारा

करमाळा  प्रतिनिधी
उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ प्रलंबित मागण्यांसाठी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. २० नोव्हेंबर) कुंभेज फाटा येथे हजारो शेतकऱ्यांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले. टेंभुर्णी-करमाळा राज्य महामार्ग रोखून शेतकऱ्यांनी शासनाचे लक्ष वेधले.
कोल्हापूर जिल्ह्याच्या धर्तीवर करमाळा तालुक्यातील उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर द्यावा, उजनीकाठच्या शेतकऱ्यांना दररोज आठ तास वीजपुरवठा करावा, दहिगाव स्टेशन उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे, २०२५ मधील अतिवृष्टीचे प्रलंबित अनुदान द्यावे, २०२६ मधील दुष्काळ निधीची पाच हजार रुपये अग्रीम मदत वंचित शेतकऱ्यांना द्यावी, सामायिक क्षेत्रधारकांना दुष्काळ निधीचा लाभ द्यावा, नमो शेतकरी योजनेचे प्रलंबित हप्ते जमा करावेत, संजय गांधी निराधार योजनेचे थकीत अनुदान द्यावे आणि लाडकी बहीण योजनेचे बंद झालेले हप्ते पुन्हा सुरू करावेत, अशा नऊ मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी राजाभाऊ कदम यांनी शासनावर नाराजी व्यक्त करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नये, असे आवाहन केले. अतिवृष्टी अनुदान, दुष्काळ निधी, वीजपुरवठा आणि उसाचा दर या प्रश्नांमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने केवळ आश्वासने न देता नऊही मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा. उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील. मागण्या मान्य न झाल्यास यापेक्षाही मोठे आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
आंदोलनाच्या शेवटी नऊ मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री यांच्या नावे शासनाचे प्रतिनिधी भंडारे साहेब यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक पी. आय. माने यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
या आंदोलनात पंचायत समितीचे माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, विद्यमान उपसभापती अजित विघ्ने, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन काळे, पंचायत समिती सदस्य स्वप्निल काळे, सरपंच संजय तोर्मल, अंकुश शिंदे, उदय देशमुख, राजाभाऊ देशमुख, भारत रोकडे, आदिनाथ कारखान्याचे संचालक दत्तू गव्हाणे, दादासाहेब लबडे, अविनाश सरडे, युवराज मगर, विनोद सरडे, प्रहारचे संदीप तळेकर, विष्णू रंधवे, विनोद शिंदे, संदीप मारकड, सर्जेराव रिटे यांच्यासह विविध गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारो शेतकरी सहभागी झाले होते.
या आंदोलनामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची तीव्रता पुन्हा एकदा समोर आली असून, नऊ मागण्यांवर शासन काय निर्णय घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!