करमाळा बसस्थानकावर चोरी करणाऱ्या महिलेस अटक; १.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

करमाळा प्रतिनिधी करमाळा बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची चोरी करणाऱ्या महिलेस करमाळा पोलिसांनी अटक करत तिच्याकडून सुमारे १ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे स्थानिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सावंत गल्ली, करमाळा येथील सौ. कमल शिवाजी खुळे या दि. २४ मार्च रोजी आपल्या मुलीला भेटण्यासाठी पुणे (लोहगाव) येथे जाण्यासाठी करमाळा बसस्थानकावरील फलाट क्रमांक १ वर परांडा–स्वारगेट बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या पर्समधील ९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, ३ हजार रुपये रोख रक्कम, ५०० रुपयांचे पैंजण आणि १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा एकूण ऐवज चोरून नेला.
या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २३९/२०२६, भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली. त्यात एक महिला फिर्यादीच्या मागे संशयास्पद हालचाली करताना दिसून आली. पुढील तपासात ही महिला मिरगव्हाण (ता. करमाळा) येथील सौ. गुडडी चैतन्य काळे असल्याचे निष्पन्न झाले.
पोलिसांनी संशयित महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले असता, चौकशीदरम्यान तिने चोरीची कबुली दिली. त्यानंतर तिला अटक करण्यात आली. अटक दरम्यान तिच्याकडून चोरीतील ९ ग्रॅम सोन्याचे गंठण, १५०० रुपये रोख रक्कम, पैंजण आणि १५ हजार रुपयांची सोन्याची अंगठी असा एकूण १,०७,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ/१६८२ मोहोळकर करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात अजित उबाळे, मनिष पवार, वैभव ठेंगल, रविराज गटकुळ, अर्जुन गोसावी, हनुमंत भराटे आणि अमोल रंदिल यांचा समावेश होता.
दरम्यान, बसस्थानक परिसरात वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपली मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.


