भाजपच्या नगरसेविका निर्मलाताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुपुत्र सचिन गायकवाड यांच्याकडून महावीर उद्यानाची स्वच्छता
करमाळा, प्रतिनिधी — महावीर जयंतीच्या निमित्ताने करमाळा शहरातील महावीर उद्यानात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भाजपच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण सभापती श्रीमती निर्मलताई गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सुपुत्र सचिन गायकवाड यांनी पुढाकार घेत हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
सचिन गायकवाड यांनी करमाळा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन उद्यानाची संपूर्ण साफसफाई केली. यामध्ये कचरा उचलणे, गवत कापणे, झाडांची छाटणी तसेच परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक कामे करण्यात आली. या उपक्रमामुळे महावीर उद्यान स्वच्छ, सुंदर आणि नागरिकांसाठी अधिक आकर्षक बनले आहे.
महावीर उद्यान आता करमाळा शहरातील नागरिकांसाठी फिरणे, व्यायाम करणे आणि विरंगुळ्यासाठी सज्ज झाले असून नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे. तसेच अशा प्रकारचे स्वच्छता उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.
या अभियानामुळे स्वच्छता व पर्यावरणाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत होणार असल्याचे सचिन गायकवाड यांनी सांगितले आहे.


