Monday, August 31, 2026
Latest:
Uncategorized

इको फ्रेंडली राखीतून निसर्गाशी नाते घट्ट करा – दिग्विजय बागल यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात ६३० हून अधिक विद्यार्थिनींचा सहभाग झाडांना बांधली पर्यावरणपूरक राखी

करमाळा : प्रतिनिधी — विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तराच्या वतीने संस्थेचे सचिव विलासरावजी घुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली इको फ्रेंडली राखी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालय परिसरातील झाडांना पर्यावरणपूरक राखी बांधून निसर्गाशी असलेले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प करण्यात आला. या उपक्रमात ६३० हून अधिक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजप युवा नेते तथा करमाळा विधानसभा मतदारसंघाचे मुख्यमंत्री बळीराजा शेत-पानंद रस्ते समितीचे सहअध्यक्ष दिग्विजय दिगंबरराव बागल उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील, सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी शीतलकुमार मोटे, सिद्धार्थ वाघमारे, हर्षवर्धन गाडे, शेखर जोगळेकर, वृक्षप्रेमी व वसुंधरा अभियानाचे तालुकाप्रमुख विजय खंडागळे, कवी-वक्ता-लेखक रवींद्र शिंदे तसेच वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना दिग्विजय बागल यांनी विद्यार्थिनींनी आपल्या आई-वडिलांची स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. विद्यार्थी दशेतच विविध कौशल्ये आत्मसात करून भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी करावी, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थिनीने दरवर्षी किमान एक झाड लावून त्याचे संवर्धन करावे आणि वृक्षसंवर्धन चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नैतिक मूल्ये जपणे, आई-वडिलांचा स्वाभिमान दुखावला जाणार नाही याची काळजी घेणे आणि आपल्या हातून कोणतेही गैरकृत्य होणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहनही बागल यांनी विद्यार्थिनींना केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी व समस्या सोडविण्यासाठी आपण सदैव सहकार्य करू, असे अभिवचन त्यांनी यावेळी दिले.
यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थिनींना आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून विद्यार्थिनींनी आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल करावी, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुणे, मान्यवर आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उपस्थितीत महाविद्यालय परिसरातील झाडांना इको फ्रेंडली राखी बांधण्यात आली. पर्यावरणाचे रक्षण आणि वृक्षसंवर्धन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी दोन्ही हात उंचावून कोणतेही गैरकृत्य न करण्याचे अभिवचन दिले.
या उपक्रमात सहभागी झालेल्या ६३० हून अधिक विद्यार्थिनींनी दिग्विजय बागल यांना भाऊ मानून राख्या बांधल्या. रक्षाबंधनाच्या पारंपरिक भावनेसोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक प्रा. लक्ष्मण राख यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मुक्ता काटवटे यांनी केले, तर आभार प्रा. सुरेखा जाधव यांनी मानले. उपस्थित विद्यार्थी, मान्यवर आणि शिक्षकांच्या सहभागामुळे कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!