पोथरे येथे साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक व नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान
करमाळा प्रतिनिधी
साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पोथरे येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा जागर आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सोमवार, दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी पोथरे येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच मंगळवार, दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता पोथरे येथे महाराष्ट्रभर आपल्या विद्रोही, बेधडक आणि प्रभावी काव्यशैलीसाठी प्रसिद्ध असलेले दंगलकार, विद्रोही कवी मा. नितीनजी चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लेखणीतून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली. त्यांच्या साहित्यिक व सामाजिक कार्यातून समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देण्यात आला. त्यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून अण्णाभाऊंच्या विचारांचा जागर होणार असून, नितीन चंदनशिवे यांच्या जाहीर व्याख्यानातून उपस्थितांना वैचारिक मेजवानी मिळणार आहे.
या दोन्ही कार्यक्रमांना पोथरे परिसरातील नागरिक, युवक, महिला, विद्यार्थी तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांवर प्रेम करणाऱ्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती, पोथरे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


