हॅपी बर्थडे माय गुरु”च्या सुरांत रंगला खैराट शाळेत भावनिक सोहळा विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भारावल्या शिक्षिका रेखा सोनकवडे; वाढदिवस ठरला अविस्मरणीय
करमाळा प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यातील खैराट जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका रेखा सोनकवडे यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहपूर्ण आणि अनोख्या पद्धतीने साजरा केला. अनपेक्षितपणे विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र येत आपल्या आवडत्या शिक्षिकेला गराडा घालत वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव केला.
विद्यार्थ्यांनी घरून आणलेल्या भेटवस्तू, स्वतः तयार केलेली शुभेच्छापत्रे, सुंदर चित्रे, हस्तनिर्मित बुके आणि चॉकलेट देऊन आपल्या प्रिय शिक्षिकेबद्दलचे प्रेम आणि आदर व्यक्त केला. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या बॅगेतून एक एक भेटवस्तू काढत “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा” असा संदेश देत शिक्षिकांना शुभेच्छा दिल्या.
शाळेच्या वर्गात रंगलेला हा जन्मोत्सवाचा सोहळा पाहताना उपस्थित शिक्षक आणि पालकांना एक वेगळाच आणि भावनिक अनुभव आला. प्राथमिक शाळेतील लहान मुलांनी आपल्या निरागस भावनेतून केलेले हे प्रेमळ अभिष्टचिंतन सर्वांनाच भारावून टाकणारे ठरले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आणलेला केक कापण्यात आला. “हॅपी बर्थडे टीचर”, “हॅपी बर्थडे माय डिअर टीचर”, “हॅपी बर्थडे माय गुरु” असा एकसुरात गजर करत विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेचा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला.
या अनोख्या आणि हृदयस्पर्शी सोहळ्यामुळे शिक्षिका रेखा सोनकवडे यांच्यासह उपस्थित सर्वजण भावूक झाले. विद्यार्थ्यांचे आपल्या शिक्षिकेवरील प्रेम आणि जिव्हाळा या प्रसंगातून स्पष्टपणे दिसून आला. यावेळी सुनील होनाजे, बाळूसिंग राजपूत, सरोजा नदाफ आदी उपस्थित होते. रेखा सोनकवडे यांनी मुलांना खाऊ वाटप करण्याबरोबर सगळ्यांना चित्रकला वह्या भेट दिली.


