जाधव कुटुंब समाजसेवेचा आदर्श कै. डॉ. प्रदीपकुमार आबा जाधव पाटील यांचे कार्य आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी – भरत भाऊ आवताडे जयंतीनिमित्त रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
करमाळा (प्रतिनिधी) :
“जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा” या उदात्त विचाराने आयुष्यभर गोरगरीब जनतेची निस्वार्थ सेवा करणारे कै. डॉ. प्रदीपकुमार आबा जाधव पाटील यांची जयंती करमाळा येथे आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त जाधव पाटील हॉस्पिटल येथे आयोजित महा रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, तर भव्य आरोग्य तपासणी शिबिरातून मोठ्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला.
कै. डॉ. जाधव पाटील यांनी आपल्या सेवाभावी वृत्तीमुळे ‘गरिबांचा डॉक्टर’ अशी ओळख निर्माण केली होती. विशेषतः सर्पदंश झालेल्या हजारो नागरिकांचे प्राण वाचवण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. त्यामुळे ते अनेकांसाठी देवदूत ठरले. त्यांच्या या महान कार्यामुळे ते आजही जनतेच्या स्मरणात जिवंत असून, नव्या पिढीसाठी त्यांचे जीवनकार्य प्रेरणादायी ठरत आहे.
या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कै. डॉ. प्रदीपकुमार आबा जाधव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंचायत समिती सदस्य भरत भाऊ आवताडे म्हणाले, “आजच्या पैशाच्या युगात माणुसकी जपणे हीच खरी श्रीमंती आहे. जाधव कुटुंबाने उभा केलेला समाजसेवेचा महायज्ञ सर्वांसाठी अनुकरणीय आहे.”
कै. डॉ. जाधव पाटील यांच्या कार्याचा वारसा त्यांचे सुपुत्र डॉ. रोहन पाटील समर्थपणे पुढे नेत असून, आबांच्या विचारांची जपणूक करत समाजसेवेची परंपरा अखंड ठेवत आहेत. तसेच बंधू संतोष पाटील, चिरंजीव अभिजीत पाटील व पुतणे अजिंक्य पाटील हेही विविध सामाजिक उपक्रमांद्वारे हे कार्य पुढे नेत आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना सवलतीच्या दरात दर्जेदार वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.
“जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले” या संतवचनाप्रमाणे जाधव कुटुंब समाजसेवेचा अखंड दीप प्रज्वलित ठेवत आहे. त्यांच्या या कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन रमेश अण्णा कांबळे, कमलादेवी सामाजिक संस्थेचे संचालक मार्गदर्शक महादेव भोसले, तात्यासाहेब जाधव, भोसेचे सरपंच प्रितम सुरवसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपाक भाई जमादार, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष सचिन काळे, युवा नेते अमोल सुरवसे, स्नेहालय इंग्लिश स्कूलचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार जयंत दळवी, अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना करमाळा तालुकाध्यक्ष पत्रकार दिनेश मडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, रक्तदान शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आरोग्य तपासणी शिबिरातील मोठा सहभाग यामुळे जाधव कुटुंबाची समाजाप्रती असलेली निष्ठा व बांधिलकी पुन्हा एकदा कृती कार्यक्रमातून सिद्ध झाले आहे.


