दत्तकला शिक्षण संस्थेत POSH कायद्याविषयी जनजागृती कार्यक्रम महिला सुरक्षितता, सन्मान आणि हक्कांविषयी विद्यार्थिनींना सविस्तर मार्गदर्शन
करमाळा प्रतिनिधी दत्तकला शिक्षण संस्थेत POSH कायद्याविषयी जनजागृती महिला सुरक्षितता आणि कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये “कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा २०१३ (POSH Act)” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ॲडव्होकेट स्नेहा विजय भापकर आणि ॲडव्होकेट कल्पना श्रीकांत साळुंके यांनी विद्यार्थिनी व महिला कर्मचाऱ्यांना पॉश कायद्याची सविस्तर माहिती दिली.
यावेळी त्यांनी महिलांचे कायदेशीर हक्क, कार्यस्थळी सुरक्षिततेचे महत्त्व, लैंगिक छळाच्या घटनांविरोधात उपलब्ध संरक्षण तसेच तक्रार निवारण प्रक्रियेविषयी सखोल मार्गदर्शन केले. महिलांनी अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवून आपल्या अधिकारांविषयी जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात बोलताना ॲडव्होकेट स्नेहा भापकर यांनी “कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण कायदा २०१३” अंतर्गत प्रत्येक संस्थेमध्ये अंतर्गत तक्रार समिती (ICC) असणे बंधनकारक असल्याचे सांगितले. महिलांना सुरक्षित, सन्मानजनक आणि सकारात्मक वातावरण मिळणे हा त्यांचा मूलभूत अधिकार असून, यासाठी संस्थांनी संवेदनशीलतेने काम करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दत्तकला शिक्षण संस्थेच्या ICC अंतर्गत तक्रार समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या कामाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
संस्थेमध्ये सध्या सुमारे ३२०० विद्यार्थिनी शिक्षण घेत असून २७२ महिला कर्मचारी कार्यरत आहेत. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संस्था सातत्याने विविध उपक्रम राबवत असल्याची माहिती कॅम्पस मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर यांनी दिली. महिला सुरक्षिततेला संस्था नेहमीच प्राधान्य देत असून विद्यार्थिनींसाठी सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास संस्थेतील सर्व प्राचार्य, शिक्षक, महिला कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमामध्ये महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच कायद्याविषयी जनजागृती निर्माण करण्यात आली आहे.


