Wednesday, June 10, 2026
Latest:
करमाळा

करमाळ्यात विकासकामांवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप लोकप्रतिनिधी केवळ श्रेयवाद करण्यात व्यस्त डिकसळ पूल, आदिनाथ कारखाना, रस्ते व विजेच्या प्रश्नांवरून नागरिक संतप्त-संदिप सरडे

करमाळा : प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील रखडलेली विकासकामे, डिकसळ पुलाचा प्रश्न, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची अवस्था, खराब रस्ते आणि विजेच्या समस्यांवरून तालुक्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. आजी-माजी लोकप्रतिनिधी केवळ श्रेयवाद करण्यात व्यस्त असून प्रत्यक्ष विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ऊस उत्पादक शेतकरी आणि नागरिकांनी केला आहे.
चिखलठाण येथील संदीप उर्फ बाबुराव सरडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात विद्यमान आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्यावर टीका करत “जनतेने निवडून दिले म्हणजे उपकार नाहीत; विकासकामे करणे हे कर्तव्य आहे,” असे म्हटले आहे.
१२ वर्षांपासून डिकसळ पुलाचा प्रश्न प्रलंबित
करमाळा आणि इंदापूर तालुक्याला जोडणारा डिकसळ पूल गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. या पुलासाठी विविध काळात निधी आणल्याचे दावे करण्यात आले; मात्र प्रत्यक्षात काम पूर्ण झालेले नाही. निवडणुकांच्या काळात पुलाच्या कामाचा गाजावाजा झाला, परंतु आजही नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
विद्यार्थी व शेतकऱ्यांना मोठा फटका
या मार्गावरून ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणावर केली जाते. बारामती ॲग्रो आणि अंबालिका कारखान्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी हा पूल महत्त्वाचा आहे. तसेच इंदापूरमध्ये शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुलाच्या अवस्थेमुळे अडचणी निर्माण होत असल्याचे सरडे यांनी नमूद केले.
आदिनाथ कारखान्यावरून टीका
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कारभारावरूनही सरडे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. निवडणुकीपूर्वी कारखाना सुरू झाल्याचा गाजावाजा करण्यात आला; मात्र कोट्यवधींचे कर्ज मिळूनही कारखाना अपेक्षित पद्धतीने चालत नसल्याची टीका करण्यात आली.
रस्ते, वीज आणि कायदा-सुव्यवस्थेवर सवाल
तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था खराब झाली असून विजेच्या प्रश्नाने नागरिक त्रस्त आहेत. तसेच वाळू चोरी आणि जुगाराच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
“आम्हाला श्रेयवाद नको; विकास हवा”
“ही वैयक्तिक टीका नसून तालुक्याच्या विकासासाठीचा आवाज आहे. रस्ते, वीज, पूल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवले गेले पाहिजेत. जनता आता केवळ आश्वासनांना भुलणार नाही,” असा इशारा संदीप उर्फ बाबुराव सरडे यांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!