करमाळा

नशेच्या इंजेक्शनच्या काळ्या बाजारावर करमाळा पोलिसांचा घाव मेफेन्टरमिन इंजेक्शनच्या १५० बाटल्या व बुलेटसह २.०९ लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक

करमाळा, प्रतिनिधी :
तरुणांमध्ये शरीरसौष्ठव वाढविण्यासाठी आणि शारीरिक क्षमता वाढविण्याच्या नावाखाली वापरल्या जाणाऱ्या प्रतिबंधित मेफेन्टरमिन इंजेक्शनच्या अवैध विक्रीवर करमाळा पोलिसांनी मोठी कारवाई करत १५० इंजेक्शनच्या बाटल्या आणि बुलेट मोटारसायकल असा एकूण २ लाख ९ हजार १३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ मे रोजी दुपारी कर्जत रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ दोन इसम प्रतिबंधित औषधांची विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रणजित माने यांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकाने साध्या वेशात सापळा रचला.
या कारवाईत Troikaa कंपनीचे MEPHENTERMINE SULPHITE INJECTION IP या औषधाच्या १०० बाटल्या आणि Termiva कंपनीच्या त्याच प्रकारातील ५० बाटल्या अशा एकूण १५० बाटल्या जप्त करण्यात आल्या. या इंजेक्शनची किंमत ४९ हजार १३३ रुपये असून आरोपींकडून १ लाख ६० हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकलही जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींकडे इंजेक्शन खरेदीची कोणतीही वैध बिले अथवा डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आढळून आले नाही. हे औषध ‘परिशिष्ट-एच’ प्रवर्गातील असून डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. अशा औषधांचा गैरवापर केल्यास आरोग्यास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले.
या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४८८/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २७८, १२५, १२३ व ३(५) अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे करीत आहेत.
आरोग्यास गंभीर धोका
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेफेन्टरमिन इंजेक्शनचा वैद्यकीय वापर कमी रक्तदाबाच्या उपचारासाठी केला जातो. मात्र काही जण शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी किंवा शरीरसौष्ठवासाठी त्याचा गैरवापर करतात. या औषधाच्या अतिवापरामुळे झोप येणे, मानसिक गोंधळ, भास होणे, आकडी येणे, हृदयाचे ठोके मंदावणे यासह हृदय व मूत्रपिंडाचे गंभीर आजार उद्भवू शकतात.
पोलिसांचे तरुणांना आवाहन
करमाळा शहर व तालुक्यातील तरुणांनी आकर्षक शरीरयष्टीसाठी अशा धोकादायक इंजेक्शनचा वापर टाळावा. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि नैसर्गिक पद्धतीने शरीरसौष्ठव मिळवावे. नशेच्या किंवा प्रतिबंधित इंजेक्शनच्या विक्रीची माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाईल, असे आवाहन करमाळा पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम धापटे तसेच पोलीस कर्मचारी अर्जुन गोसावी, मिलिंद दहिहांडे, अमोल रंदिल आणि स्वप्निल शेरखाने यांच्या पथकाने केली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!