निंभोरे ग्रामपंचायतीचा अभिनव उपक्रम : पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी भरणार -सरपंच रविंद्र वळेकर
करमाळा प्रतिनिधी निंभोरे, ता. करमाळा : जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी आणि शासकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी निंभोरे ग्रामपंचायतीने अभिनव पुढाकार घेतला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व वस्ती शाळेत चालू शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची चालू वर्षाची घरपट्टी ग्रामपंचायतीचे सरपंच रविंद्र (रविदादा) वळेकर स्वतः भरणार असल्याची घोषणा करण्यात आली.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, निंभोरे येथे पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरमध्ये बसवून संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली. हलगीच्या गजरात निघालेल्या या मिरवणुकीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी आणि गावातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना सरपंच रविंद्र वळेकर यांनी, “जिल्हा परिषद शाळा वाचवणे ही काळाची गरज असून गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गावकऱ्यांनी शासकीय शाळांना प्राधान्य द्यावे,” असे आवाहन केले. त्यांच्या या निर्णयाचे पालक वर्गातून स्वागत होत असून, ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशसंख्या वाढण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमादरम्यान शाळेतील सहशिक्षिका श्रीमती सानप मॅडम यांची केंद्रप्रमुखपदी निवड झाल्याबद्दल ग्रामपंचायत निंभोरे व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, गुलाबाची फुले आणि खाऊ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच रविदादा वळेकर, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महादेव वळेकर, पंजाब गाडे, प्रविण वळेकर, लालू कळसाईत, भिमराव काळदाते, कुंडलिक काळदाते, गणेश सलगर, अशोक अण्णा जगताप, पांडुरंग दळवे, श्रीराम काळे सर, संतोष जगताप, अक्षय वळेकर, नाथाभाऊ शिंदे, संजय माळी, नंदू जगताप, भालचंद्र गुरव, सोमा गुरव, जहांगीर शेख, नितीन गायकवाड, भोलेनाथ गवळी, शालेय समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


