Monday, September 21, 2026
Latest:
Uncategorized

वाढदिवसाचा अनोखा उत्सव आकाश चिवटे यांच्याकडून १५० झाडांचे वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा दिला प्रेरणादायी संदेश


करमाळा प्रतिनिधी : आजच्या धावपळीच्या युगात वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठमोठे कार्यक्रम, केक कापणे, फटाक्यांची आतषबाजी किंवा खर्चिक आयोजन केले जाते. मात्र करमाळ्यातील चिवटे हॉटेलचे मालक युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते आकाश चिवटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सलग सहाव्या वर्षी १५० झाडांचे वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाची सामाजिक जबाबदारी पार पाडली.
हवामान बदल, वाढते प्रदूषण आणि घटणारे वनक्षेत्र ही सध्याची गंभीर समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपणास प्राधान्य दिले पाहिजे, या विचारातून आकाश चिवटे यांनी हा उपक्रम राबविला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली झाडे अधिक चांगल्या प्रकारे वाढतील आणि परिसर हिरवागार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या वृक्षारोपण मोहिमेत विविध प्रकारची फळझाडे, सावलीची झाडे आणि पर्यावरणपूरक प्रजातींची लागवड करण्यात आली. धायखिंडी गावातील सदस्य, मित्रपरिवार, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत उपक्रम यशस्वी केला. वृक्षारोपणाबरोबरच झाडांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचाही निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना आकाश चिवटे म्हणाले की, “वाढदिवस हा केवळ आनंद साजरा करण्याचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी सकारात्मक करण्याची संधी आहे. प्रत्येकाने आपल्या वाढदिवसानिमित्त किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प केला तर पर्यावरण संवर्धनासाठी मोठे योगदान मिळू शकते.”
वाढदिवसानिमित्त प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देणाऱ्या सर्व हितचिंतकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार मानले. तसेच आपल्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे प्रेम व आशीर्वाद हेच आपली खरी ताकद असल्याचे त्यांनी सांगितले.
आकाश चिवटे यांच्या या पर्यावरणपूरक उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, वाढदिवस साजरा करण्याचा हा आदर्श आणि समाजोपयोगी संदेश अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “झाडे लावूया, झाडे जगवूया आणि करमाळा शहरासह संपूर्ण परिसर हिरवागार बनवूया” हा संदेश त्यांच्या उपक्रमातून प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!