शंभुराजे जगताप यांच्या बिनविरोध निवडीने करमाळ्यात जल्लोष सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर सोसायटी मतदारसंघातून प्रतिनिधित्व जगताप कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचे सहकार क्षेत्रातील राजकारणात पदार्पण
करमाळा : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत करमाळा तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून शंभूराजे जयवंतराव जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याने करमाळा तालुक्यात जगताप समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. करमाळा शहरातील विविध ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण आणि आनंदोत्सव साजरा करून या निवडीचे स्वागत करण्यात आले.
सोसायटी मतदारसंघातील उमेदवार सुभाष गुळवे यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्यानंतर या मतदारसंघातून शंभूराजे जगताप यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत नामंजूर झाल्यानंतर जगताप गटाकडून युवा नेते आणि करमाळा खरेदी-विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांची भाजपप्रणीत पॅनेलमधून उमेदवारी अंतिम करण्यात आली होती.
शंभूराजे जगताप यांच्या या निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. जगताप कुटुंबाचा सहकार क्षेत्रातील प्रदीर्घ राजकीय वारसा आता तिसऱ्या पिढीकडे सुपूर्द झाला आहे. यापूर्वी स्व. नामदेवराव जगताप यांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तसेच संचालक म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी बँकेचे उपाध्यक्ष आणि संचालक म्हणून दीर्घकाळ कार्यरत राहून सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आता शंभूराजे जगताप यांच्या माध्यमातून जगताप कुटुंबाची तिसरी पिढी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात दाखल झाली आहे.
करमाळा तालुक्याच्या सहकार क्षेत्रात जगताप कुटुंबाचे अनेक वर्षांपासून महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. त्यामुळे शंभूराजे जगताप यांच्या बिनविरोध निवडीकडे केवळ राजकीय यश म्हणून नव्हे, तर जगताप कुटुंबाच्या सहकारातील वारशाची पुढील वाटचाल म्हणून पाहिले जात आहे. या निवडीमुळे जगताप समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, करमाळा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.


