करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुन रोजी‘आधार मेळावा नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा – उदय बंडगर
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा पोस्ट ऑफिसमध्ये १३ जुनं रोजी आधार मेळावा आयोजित केला असुन नागरिकांनी संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करमाळा पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर उदय बंडगर यांनी केली आहे.भारतीय डाक विभागाच्या करमाळा पोस्ट ऑफिसच्या वतीने शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी विशेष ‘आधार नोंदणी व अद्ययावत (Update) मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५.०० या वेळेत हा मेळावा करमाळा पोस्ट ऑफिस येथे पार पडणार असून नागरिकांना विविध आधार सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
या मेळाव्यात नवीन आधार नोंदणी, मोबाईल क्रमांक अद्ययावत करणे, पत्ता बदल, नाव अथवा जन्मतारीख दुरुस्ती तसेच बायोमेट्रिक अपडेट (फोटो, फिंगरप्रिंट व आयरिस) अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. नागरिकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेऊन भारतीय डाक विभागाने हा विशेष उपक्रम हाती घेतला आहे.
आधार कार्ड हे आजच्या डिजिटल युगातील अत्यंत महत्त्वाचे ओळखपत्र असल्याने त्यातील माहिती अचूक आणि अद्ययावत असणे आवश्यक आहे. अनेक शासकीय योजना, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक प्रवेश तसेच इतर सेवांसाठी आधारची आवश्यकता भासत असल्याने नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
करमाळा पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तर उदय बंडगर यांनी सांगितले की, आधारशी संबंधित विविध सेवांचा लाभ नागरिकांना सहज व जलद पद्धतीने मिळावा यासाठी हा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील तसेच परिसरातील नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून आधार नोंदणी, दुरुस्ती व अद्ययावत करण्याची कामे करून घ्यावीत. या उपक्रमामुळे नागरिकांचा वेळ वाचणार असून त्यांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
भारतीय डाक विभागाच्या या उपक्रमामुळे नागरिकांना आधार संबंधित सेवा अधिक सुलभपणे मिळणार असून मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पोस्टमास्तर उदय बंडगर यांनी केले आहे.


