ग्लोबल डिफेन्स अकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न!
करमाळा प्रतिनिधी
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय सेवांमध्ये करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘ग्लोबल डिफेन्स अकॅडमी’चा उद्घाटन सोहळा बुधवार, दि. १८ नोव्हेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. विक्रम बोंद्रे सर (संस्थापक, गुरुकुल ज्ञानसंकुल, बारामती), श्री. संदीपान गुटाळ सर (अध्यक्ष, MESTA, सोलापूर जिल्हा) आणि डॉ. रविकिरण पवार (संचालक, ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट) उपस्थित होते.यावेळी संदीपान गुटाळ सर यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची माहिती देत शासकीय सेवांमधील उपलब्ध संधी, परीक्षांचे स्वरूप आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.तर विक्रम बोंद्रे सर यांनी कमी वयात शासकीय नोकरी मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या वयापासून नियोजन करावे, अभ्यासाची दिशा कशी ठरवावी आणि योग्य वेळी तयारीला सुरुवात करण्याचे महत्त्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना करिअरविषयक नवी दिशा मिळाली.
यावेळी डॉ. रविकिरण पवार यांनी ग्लोबल डिफेन्स अकॅडमीच्या या उपक्रमाचे कौतुक करून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्याच्या या प्रयत्नाला त्यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.प्रा. डॉ. महेश निकत यांच्या संकल्पनेतून सुरू झालेली ग्लोबल डिफेन्स अकॅडमी ही करमाळा व परिसरातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती, आर्मी, एनडीए आणि अग्निवीर भरतीसाठी मार्गदर्शन करणारी महत्त्वपूर्ण शैक्षणिक संधी ठरणार आहे.विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शारीरिक क्षमता आणि देशसेवेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.कार्यक्रमास पालक, विद्यार्थी, शिक्षक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.शिस्तीतून सामर्थ्याकडे… देशसेवेच्या ध्येयाकडे!”या ध्येयाने ग्लोबल डिफेन्स अकॅडमीने आपल्या वाटचालीचा शुभारंभ करण्यात आला.


