Sunday, September 20, 2026
Latest:
करमाळा

ब्राह्मण समाजाच्या संघटनासाठी केम येथे मेळावा; तरुणांनी समाज विकासासाठी पुढाकार घ्यावा – संतोष काका कुलकर्णी

करमाळा प्रतिनिधी केम (ता. करमाळा) : अल्पसंख्यांक व विखुरलेल्या ब्राह्मण समाजाने एकत्र येऊन संघटित व्हावे, समाजातील प्रश्न सामूहिकपणे सोडवावेत आणि नव्या पिढीला विकासाच्या प्रवाहात आणावे, या उद्देशाने अखिल भारतीय ब्राह्मण संघटना, करमाळा तालुक्याच्या वतीने केम येथे समाजबांधवांची बैठक उत्साहात पार पडली.
बैठकीस अखिल भारतीय ब्राह्मण संघटना करमाळा तालुकाध्यक्ष संतोष (काका) कुलकर्णी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. सुरेश थिटे महाराज होते. प्रारंभी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी यांचा ह.भ.प. सुरेश थिटे महाराज यांच्या हस्ते शाल, फेटा व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच तालुका उपाध्यक्ष सूर्यपूजारी यांचा सत्कार विजयकुमार कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकात पराग कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाने एकजूट राखून संघटित होण्याची गरज अधोरेखित केली. समाज एकत्र आला तर सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात अधिक सक्षमपणे वाटचाल करू शकतो, असे त्यांनी सांगितले.
प्रसाद पाठक यांनी आपल्या परखड भाषणात ब्राह्मण समाजाच्या संघटनशक्तीवर भर देताना सांगितले की, करमाळा तालुक्यात ब्राह्मण समाजाची तीस हजारांहून अधिक मतदारसंख्या आहे. समाज एकसंघ राहिला तर राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व निर्माण होऊ शकते. समाजाच्या संघटित शक्तीमुळे अनेक प्रश्न मार्गी लागू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
तालुकाध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात तरुण पिढीने समाज विकासासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले. समाजाबरोबरच इतर समाजघटकांनाही सोबत घेऊन सर्वांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच समाजातील युवकांना रोजगार व उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन मिळावे यासाठी परशुराम विकास महामंडळाचे अध्यक्ष दामले यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली. महामंडळामार्फत उद्योजकांना अधिकाधिक बिनव्याजी कर्जपुरवठा करण्याचे आश्वासन मिळाल्याचे सांगत, समाजातील युवकांनी उद्योग क्षेत्रात पुढे येऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे आभार दत्ता कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋग्वेद तरकसे, समर्थ रामदासी, सर्वेश तरकसे, भैय्या पाठक यांच्यासह समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले.
या बैठकीमुळे करमाळा तालुक्यातील ब्राह्मण समाजाच्या संघटनात्मक चळवळीला नवी दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!