करमाळा

करमाळा नगरपरिषदेचा पर्यावरण संवर्धनासाठी मोठा संकल्प पाच हजार वृक्ष लागवड होणार जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महावीर उद्यानात वृक्षारोपण स्वच्छता अभियान आणि जनजागृती

करमाळा प्रतिनिधी करमाळा, ता. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करमाळा नगरपरिषदेच्या वतीने महावीर उद्यान येथे वृक्षारोपण व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी करमाळा शहरात यावर्षी तब्बल पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती उद्यान प्रमुख अश्विनी जाधव यांनी दिली.
कार्यक्रमात बोलताना जाधव म्हणाल्या की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि शहर हिरवेगार करण्यासाठी वृक्ष लागवड अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने नगरपरिषदेकडून शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे.
या वेळी पाणीपुरवठा अभियंता शितल बहाड, सुप्रिया पालखे, आरोग्य निरीक्षक विपुल पुजारी, सोमनाथ सरवदे, हिंदुराव जगताप, सचिन घाटोळे, गणेश शिंदे, संकल्प शहाणे, सोहेल दारुवाले, संजय जगताप, पियुष शिंपी, विक्रम कांबळे, तुषार टांकसाळे, प्रदीप चौकटे, गणेश फलके, चिंटू कांबळे, मयूर लालबेग, बद्रीनाथ गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात वनीकरणाच्या संकल्पनेतून दोन ते तीन फूट अंतरावर सुमारे दोन ते तीन हजार झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला. बकुळ, करंज, अर्जुन, कडुलिंब, पिंपळ, वड आणि ताम्हण यांसारख्या देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असून त्यांच्या संगोपनासाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी वृक्षारोपणाबरोबरच वृक्ष संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. पर्यावरण संरक्षणासाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
महावीर उद्यान परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. “स्वच्छता राखा, झाडे लावा-झाडे जगवा, कापडी पिशवीचा वापर करा, पर्यावरण वाचवा, स्वच्छता ही सर्वांची जबाबदारी आहे” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!