Saturday, June 20, 2026
Latest:
करमाळा

शेलगाव ‘क’मध्ये ‘गाव माझा प्रतिष्ठान’चा स्तुत्य उपक्रम विद्यार्थ्यांना शालेय साहित्य; शाळेसाठी देणग्या व इन्व्हर्टर-बॅटरी संचाची भेट

.
करमाळा, प्रतिनिधी.: करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव ‘क’ येथे गाव माझा प्रतिष्ठान तर्फे विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. पायघन वस्ती शाळा आणि जिल्हा परिषद शाळेतील एकूण ५३ विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य वेळेवर उपलब्ध व्हावे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवरील शैक्षणिक खर्चाचा ताण कमी व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक पांडुरंग वीर सर होते. यावेळी सरपंच प्रतिनिधी राहुल कुकडे, माजी उपसरपंच सचिन वीर, माजी ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ वीर, वैभव वीर, गणेश माने, डॉ. विकास वीर, मयूर वीर, बाबुराव माने, केशव दास, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण वीर, सचिन जगताप, मुख्याध्यापक दत्तात्रय जाधव, मुख्याध्यापक भीमराव बनसोडे, नरसाळे गुरुजी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. विकास वीर यांनी गाव माझा प्रतिष्ठान या संकल्पनेची माहिती देताना सांगितले की, ही संस्था अनौपचारिक आणि नोंदणीकृत नसली तरी शेलगावच्या सामाजिक विकासासाठी गावाशी भावनिक नाते असलेल्या नागरिकांना एकत्र आणण्याचे काम करत आहे. “ज्यांना शेलगाव हे आपले गाव वाटते, अशा प्रत्येकाने गावाच्या विकासासाठी पुढाकार घ्यावा, या उद्देशाने ही संकल्पना उभी करण्यात आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश वितरण, आरोग्य तपासणी शिबिरे, बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, संजय गांधी निराधार योजनेचा लाभ पात्र ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच हरित शेलगाव अभियानांतर्गत वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि स्वच्छता अभियान असे विविध सामाजिक उपक्रम आगामी काळात राबविण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सेवानिवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग वीर सर यांनी ११ हजार रुपयांची देणगी जाहीर केली. तसेच ह.भ.प. हरिहर महाराज यांनी ५ हजार ५५१ रुपयांची देणगी जाहीर करून उपक्रमाला पाठबळ दिले.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून गावातील युवा कार्यकर्ते धोंडीराम वीर यांनी शाळेला इन्व्हर्टर व बॅटरी संच भेट दिला. या भेटीमुळे वीजपुरवठ्यातील अडचणींवर मात करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविता येणार असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि ग्रामविकास यांचा संगम घडविणाऱ्या अशा उपक्रमांची आजच्या काळात नितांत आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
ग्रामस्थांच्या एकजुटीतून आणि सामाजिक जाणिवेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, शिक्षणाच्या माध्यमातून समाजपरिवर्तनाची दिशा देणारा ठरला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!