मांगी तलावाच्या पाण्यासाठी शेतकरी आक्रमक; १९ जून रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलन
करमाळा, प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणी हाळगाव येथील कृषी विद्यालयासाठी देण्याचा शासनस्तरावर निर्णय झाल्याच्या पार्श्वभूमीवर मांगी गावासह तलावाच्या लाभक्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी मांगी तलाव पाणी वाचवा संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार, दि. १९ जून रोजी सकाळी १० वाजता करमाळा तहसील कार्यालयासमोर सर्वपक्षीय आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मांगी तलाव हा करमाळा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी जीवनवाहिनी ठरला आहे. या तलावाच्या पाण्यावर केवळ मांगी गावच नव्हे, तर परिसरातील सुमारे २२ गावांतील शेती, पिण्याचे पाणी आणि पशुधन अवलंबून आहे. तलावाच्या पाण्यामुळे हजारो एकर शेती बागायतीखाली आली असून परिसरातील पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.
तलाव उभारणीसाठी पूर्वी अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जमिनींचे त्याग करून योगदान दिले होते. पुढील पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेल्या या त्यागाचा विचार न करता तलावातील पाणी अन्य ठिकाणी वळविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.
“मांगी तलावातील एक थेंबही पाणी बाहेर जाऊ देणार नाही,” असा निर्धार संघर्ष समितीने व्यक्त केला आहे. या प्रश्नावर तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार असून, पुढील आंदोलनाची दिशा देखील याच बैठकीत ठरविण्यात येणार आहे.
हे आंदोलन राजकारणविरहित असून सर्व पक्ष, संघटना, शेतकरी आणि ग्रामस्थांनी गट-तट बाजूला ठेवून एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


