वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात
करमाळा प्रतिनिधी
नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या विकासासाठी योगदान देऊन साजरा करण्याचा आगळावेगळा उपक्रम साई पेट्रो केमिकलचे मालक तथा उद्योगपती आणि भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोषकाका मुरलीधर कुलकर्णी यांनी केला. त्यांचा नातू चि. मल्हार शुभम कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विकासासाठी पाच हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
राजुरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाल्याच्या आनंदात हा उपक्रम करण्यात आला. विद्या विकास मंडळाचे सचिव व मार्गदर्शक विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते देणगीची रक्कम शाळेला सुपूर्द करण्यात आली. शाळेच्या वतीने मार्गदर्शक अनिल साखरे (मेजर साहेब) यांनी देणगी स्वीकारली. यावेळी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड सर सुरताल संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे सर उपस्थित होते.
वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा कुलकर्णी परिवाराचा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, तसेच ग्रामीण भागातील शाळांचा विकास व्हावा, यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
या कार्यक्रमाला राजुरीचे सरपंच राजेंद्र भोसले, श्रीकांत साखरे, माजी सरपंच संजय सांरगकर ,माजी सरपंच डॉ. अमोल दुरंदे, डॉक्टर विद्या दुरंदे,अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष दिनेश मडके, प्रसिद्धीप्रमुख सचिन चव्हाण सचिन काका कुलकर्णी, निलेश गंधे,मनोज कुलकर्णी, अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे उपाध्यक्ष भारत घुगीकर बाळु साखरे लक्ष्मण शिंदे , रामभाऊ शिंदे, मेजर अनिल साखरे बाबु दुरंदे,बंडु गुरुजी,बंडु शिंदे,शरद मोरे, पप्पू साखरे सर, श्रीपाद आडकर सर,डॉक्टर सुहास कुलकर्णी यांच्यासह राजुरी गावातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कुलकर्णी परिवारातील सदस्य, मित्रपरिवार, शाळेतील विद्यार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी चि. मल्हार शुभम कुलकर्णी यास वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला ‘आदर्श शाळा’ पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
वाढदिवसानिमित्त शाळेला देणगी देऊन ‘आनंदासोबत सामाजिक दायित्व’ जपण्याचा संदेश कुलकर्णी परिवाराने दिला. शाळेच्या विकासासाठी देण्यात आलेली ही देणगी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांसाठी उपयोगी ठरणार असून, या सामाजिक उपक्रमाबद्दल ग्रामस्थांकडून कुलकर्णी परिवाराचे कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे उपाध्यक्ष संजय साखरे सर यांनी केले.


