योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार
*
करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक यांचे सुपुत्र कु. हरिश गोकुळ मंडलिक याने तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत करमाळा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरसह तालुक्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
कु. हरिश मंडलिक याने योगासनाचा नियमित सराव, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे मंडलिक कुटुंबीयांसह साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते कु. हरिश मंडलिक याचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्याच्या यशाचे कौतुक करून त्याला पुढील शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रातील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी रोहिदास आल्हाट, चेतन आल्हाट, कृष्णा आल्हाट यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी कु. हरिशचे अभिनंदन करत त्याने भविष्यात योगासन क्षेत्रात आणखी मोठी मजल मारावी, अशी सदिच्छा व्यक्त करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.


