Sunday, September 13, 2026
Latest:
Uncategorized

नाबार्डच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचा गौरवनाबार्डच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीचा गौरव

करमाळा प्रतिनिधी
नाबार्डच्या ४५ व्या स्थापना दिनानिमित्त गुरुवार, दि. १६ जुलै रोजी पुणे येथे आयोजित विशेष कार्यक्रमात करमाळ्यातील राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या कार्याचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय (मामा) भरणे हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी राज्यभरातील महिला शेतकरी, महिला-नेतृत्वाखालील शेतकरी उत्पादक कंपन्या (FPOs), स्वयं-सहाय्यता बचत गट (SHGs), प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) तसेच ग्रामीण उद्योजक यांचा ग्रामीण परिवर्तनातील उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरव व सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास श्री. जयकिश, मुख्य महाव्यवस्थापक (CGM) व प्राचार्य, CAB, पुणे; श्री. विवेक नचणे, महाव्यवस्थापक व समन्वयक, राज्यस्तरीय बँकर्स समिती (SLBC), महाराष्ट्र; डॉ. भारत काकडे, अध्यक्ष, BAIF; श्री. विद्याधर अनास्कर, प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MStCB); तसेच डॉ. ए. व्ही. भवानी शंकर, मुख्य महाव्यवस्थापक, नाबार्ड यांची प्रमुख उपस्थिती होती.
उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील २२ महिलांचा सन्मान यावेळी करण्यात आला.या कार्यक्रमात राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या संचालिका सौ.अलका नलवडे आणि सौ. सुपर्णा बागल यांनी सहभाग नोंदविला. यावेळी सौ. अलका नलवडे यांनी आपल्या मनोगतात ग्रामीण महिलांचे शेतीतील योगदान, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार आणि ड्रोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सेवेसाठी केलेल्या कार्याचा प्रवास प्रभावीपणे मांडला.
सौ.नलवडे यांच्या प्रेरणादायी मनोगताचा उल्लेख कृषिमंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी आपल्या भाषणात विशेषत्वाने करत महिलांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत परिवर्तन घडवून आणल्याचे कौतुक केले. या सन्मानामुळे करमाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, राजे रावरंभा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!