अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळाचा ५१ उपनयन संस्कारांचा संकल्प समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – संतोष (काका) कुलकर्णी
करमाळा, प्रतिनिधी :
ब्राह्मण समाजातील वैदिक परंपरा, धार्मिक संस्कार आणि भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळा यांच्या वतीने ५१ सामूहिक उपनयन संस्कार (मुंज) सोहळा आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प करण्यात आला आहे. संस्थेचे तालुकाध्यक्ष संतोष (काका) कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीत उपनयन संस्काराचे धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आजच्या बदलत्या काळात मुलांमध्ये भारतीय संस्कृती, वैदिक परंपरा, शिस्त आणि नैतिक मूल्यांची जोपासना होणे आवश्यक असल्याने सामूहिक उपनयन संस्कार उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या उपक्रमात करमाळा तालुक्यातील ब्राह्मण समाजातील कुटुंबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
तालुकाध्यक्ष संतोष (काका) कुलकर्णी म्हणाले, सामूहिक उपनयन संस्कार हा केवळ धार्मिक विधी नसून भारतीय संस्कृतीची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी उपक्रम आहे. समाजातील ऐक्य अधिक दृढ व्हावे, वैदिक परंपरा टिकून राहाव्यात आणि प्रत्येक कुटुंबाला या संस्काराचा लाभ मिळावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. ५१ उपनयन संस्कारांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या बैठकीस मंगेश देशपांडे, सुधीर ढोके, शैलेश खळदकर, चंद्रकांत कुलकर्णी, संकेत कुलकर्णी, आनंद विद्वत, नागेश विद्वत, शुभम कुलकर्णी आणि रविंद्र विद्वत यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नियोजन, नोंदणी प्रक्रिया, जनजागृती आणि विविध समित्यांच्या स्थापनेबाबत सविस्तर चर्चा केली.
यावेळी इच्छुक पालकांनी लवकरात लवकर नोंदणी करून या सामूहिक उपनयन संस्कार सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळा यांच्या या उपक्रमामुळे तालुक्यात वैदिक संस्कारांना नवचैतन्य मिळेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
अशी माहिती अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक शाखा करमाळा तालुकाध्यक्ष संतोष (काका) कुलकर्णी यांनी दिली आहे.


