Tuesday, July 28, 2026
Latest:
Uncategorized

विद्यार्थ्यांच्या मनातील लाडक्या ‘बाई’, कुटुंबाचा आधारवड आणि नात्यांची जपणूक करणारी आदर्श मावशी! सौ. उज्वला राजेंद्र नायकुडे (कुटे)  

शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना अक्षरओळख करून देत नाही, तर तो समाजाचे भविष्य घडवत असतो.” या विचाराला आपल्या संपूर्ण आयुष्याने साकार करणाऱ्या सौ. उज्वला राजेंद्र नायकुडे (कुटे) यांचा जीवनप्रवास म्हणजे संघर्षातून उभे राहिलेल्या यशाचा, ज्ञानदानातून फुललेल्या संस्कारांचा आणि नात्यांना जपणाऱ्या सेवाभावाचा प्रेरणादायी इतिहास आहे.
करमाळा तालुक्यातील एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडील कै. बाबुराव कुटे हे एसटी महामंडळात कंडक्टर म्हणून कार्यरत होते. चार बहिणी, तीन भाऊ आणि गृहिणी आई अशा मोठ्या कुटुंबात वाढताना त्यांनी लहानपणापासूनच कष्ट, शिस्त आणि शिक्षणाचे महत्त्व आत्मसात केले. आर्थिक परिस्थिती मर्यादित असली तरी स्वप्ने मात्र मोठी होती. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा दृढ निश्चय त्यांनी कधीही ढळू दिला नाही.
बारावीनंतर त्यांनी डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले आणि शिक्षक होण्याचे स्वप्न साकार केले. करमाळा तालुक्यातील पांडे येथून त्यांच्या अध्यापन कारकिर्दीची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांप्रती प्रेम, शिस्तबद्ध अध्यापन आणि संस्कारक्षम शिक्षण यामुळे त्या अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनात स्थान निर्माण करू शकल्या.
विवाहानंतर पुण्यात स्थायिक होत त्यांनी जिल्हा परिषद शाळा, नरे (ता. मुळशी, जि. पुणे) येथे अनेक वर्षे पदवीधर शिक्षिका म्हणून उल्लेखनीय सेवा बजावली. त्यांच्या वर्गातून बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देणाऱ्या शिक्षिका म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. उत्कृष्ट शैक्षणिक कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या निष्ठेची आणि समर्पणाची समाजाने दिलेली दाद आहे.
त्यांच्या जीवनातील दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांचा आदर्श संसार. अभियंता राजेंद्र नायकुडे यांच्या खंबीर साथीने त्यांनी प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मानाच्या आधारावर आदर्श कुटुंब उभे केले. मुलगे निखिल आणि अनिकेत यांनी उच्च शिक्षण घेऊन आपल्या क्षेत्रात यशस्वी कारकीर्द घडविली. सुना आरती आणि कावेरी या उच्चशिक्षित असून कुटुंबातील संस्कारांची परंपरा पुढे नेत आहेत. दोन नातू आणि एक नात यांच्या सहवासात त्यांचे आयुष्य अधिक आनंदमय झाले आहे.
नात्यांना जपणे ही त्यांची सर्वात मोठी ताकद आहे. प्रत्येक नातेवाईकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे, मदतीचा हात पुढे करणे, प्रेमाने सर्वांना एकत्र ठेवणे आणि आपुलकीने प्रत्येकाशी वागणे हा त्यांच्या स्वभावाचा स्थायीभाव आहे. त्यामुळे त्या केवळ आपल्या कुटुंबापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत, तर संपूर्ण नातेसंबंधांना जोडणारा प्रेमाचा धागा बनल्या.
अध्यात्म हा त्यांच्या जीवनाचा श्वास आहे. श्री दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराजांवरील त्यांची अढळ श्रद्धा, सत्कर्मावरचा विश्वास आणि सकारात्मक जीवनदृष्टी यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अधिक तेजस्वी बनविले आहे. “जसे कर्म तसे फळ” या जीवनतत्त्वावर विश्वास ठेवत त्यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणा, सेवाभाव आणि माणुसकी जपली.
आज त्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत असल्या तरी त्यांचे कार्य कधीही निवृत्त होणार नाही. कारण शिक्षकी पेशा हा नोकरी नसून समाजसेवेचा अखंड यज्ञ आहे. त्यांनी प्रज्वलित केलेली ज्ञानाची ज्योत, विद्यार्थ्यांमध्ये रुजविलेले संस्कार आणि कुटुंबात जोपासलेली मूल्ये पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.
आज त्या आदर्श शिक्षिका आहेत, कारण त्यांनी विद्यार्थ्यांचे भविष्य घडविले. त्या आदर्श माता आहेत, कारण त्यांनी कर्तृत्ववान संतती घडविली. त्या आदर्श भगिनी आहेत, कारण त्यांनी नात्यांना जिवापाड जपले. आणि त्या आदर्श मावशी आहेत, कारण त्यांनी प्रेम, माया आणि संस्कारांनी संपूर्ण कुटुंब समृद्ध केले.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आनंद, समाधान, आध्यात्मिक उन्नती आणि अखंड समाजसेवेची ऊर्जा लाभो, हीच श्री दत्त आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
शब्दांकन : दिनेश मडके
पत्रकार अध्यक्ष, अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना, करमाळा
राज्य कार्यकारिणी सदस्य

error: Don\'t try to copy. Content is protected !!