Tuesday, July 28, 2026
Latest:
Uncategorized

दहिगाव उपसा सिंचनचे पाणी नेरले-सालसे तलावात सोडा पाणीटंचाईचे संकट गडद; औदुंबरराजे भोसले पाटील यांची मागणी कुकडी विभागाला लेखी निवेदन

करमाळा, प्रतिनिधी :
करमाळा तालुक्यातील नेरले, सालसे, केम परिसरात पावसाळा सुरू असूनही अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. ओढे, तलाव आणि बंधारे पूर्णपणे कोरडे पडल्याने नागरिकांसह पशुधनालाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी तातडीने नेरले-सालसे तलाव तसेच परिसरातील बंधाऱ्यांमध्ये सोडावे, अशी मागणी नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी केली आहे.
यासंदर्भात त्यांनी कुकडी डावा कालवा उपविभाग, करमाळा कार्यालयाकडे लेखी निवेदन सादर केले असून, नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची विनंती केली आहे.
भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्डूवाडी-करमाळा मार्गालगत साडे ओढ्यावर नेरले-सालसे तलाव असून, घोटी येथून येणाऱ्या ओढ्यावर नेरले येथे दुसरा तलाव आहे. या दोन्ही ओढ्यांवर अनेक लहान-मोठे बंधारे उभारण्यात आले आहेत. मात्र, यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये पाण्याचा थेंबही शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे परिसरातील विहिरींची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटली असून, अनेक विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत.
परिसरात जनावरांसाठी चारा उपलब्ध असला तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, पशुधनासाठीही पाण्याची टंचाई जाणवत आहे.
भोसले यांनी सांगितले की, पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून उजनी धरण भरण्याच्या मार्गावर आहे. अशा परिस्थितीत दहिगाव योजनेतून पिण्याच्या पाण्यासाठी काही प्रमाणात पाणी सोडल्यास या भागातील गंभीर समस्या दूर होऊ शकते. साडे येथून पाणी सोडल्यास नेरले-सालसे तलाव भरू शकतो, तर निंभोरे-घोटी मार्गे पाणी सोडल्यास दुसरा तलाव आणि त्यावरील सर्व बंधारेही भरू शकतात.
या तलावांमधील पाण्यावर वरकुटे, अळसुंदे, सालसे, नेरले, आवाटी, लोणी (ता. माढा) यासह अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीचे सिंचन आणि पशुधनाची पाण्याची गरज अवलंबून आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“उजनी धरणाचे पाणी शेकडो किलोमीटरपर्यंत पोहोचू शकते, मग या परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी ते का सोडले जाऊ शकत नाही?” असा सवाल सामान्य नागरिकांकडून उपस्थित होत असल्याचेही भोसले यांनी सांगितले.
लोकप्रतिनिधी, जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि प्रशासनाने नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन दहिगाव उपसा सिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, जेणेकरून नेरले-सालसे परिसरातील तलाव, बंधारे आणि विहिरींना जीवदान मिळेल तसेच नागरिक, शेतकरी आणि पशुधनाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघेल, अशी मागणी नेरले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा हिंदवी स्वराज्य ग्रुपचे संस्थापक औदुंबरराजे भोसले यांनी नागरिकांच्या वतीने केली आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!