Tuesday, September 22, 2026
Latest:
Uncategorized

शिवस्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही : पालकमंत्री जयकुमार गोरे करमाळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन; भव्य भगवा ध्वज उभारण्यासाठीही निधी देण्याची घोषणा

करमाळा : प्रतिनिधी
करमाळा शहरात साकारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासह शिवस्मारकाच्या कामासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. पुतळा व स्मारकाचे काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता असल्यास त्यासाठी विनंती करण्याची गरज नाही. कामासाठी जेवढा निधी लागेल तेवढा उपलब्ध करून देऊ, असा ठाम शब्द सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिला. तसेच पुतळा उभारण्यात येणाऱ्या चौकात भव्य भगवा ध्वज उभारण्यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा त्यांनी केली.
करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा स्मारकाच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी पालकमंत्री गोरे बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा मोहिनी सावंत, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या रश्मी दिली बागल, भाजप  जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ चिवटे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, उपनगराध्यक्ष अतुल फंड, शिवस्मारक समितीचे अध्यक्ष प्रवीण जाधव, भाजप युवा नेते, दिग्विजय बागल,  जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील,सावंत गटाचे नेते सुनील सावंत, नगरसेवक संजय सावंत बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲड राहुल सावंत यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवप्रेमी उपस्थित होते.
पालकमंत्री गोरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, त्यांचे विचार, कार्य आणि आदर्श आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. शिवरायांचे विचार आणि संस्कार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रत्येकाने केले पाहिजे. करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. या पुतळ्याच्या भूमिपूजनाचा ऐतिहासिक क्षण अनुभवण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी आयोजक आणि शिवप्रेमींचे अभिनंदन केले.
या शिवस्मारकाच्या कामासाठी यापूर्वी ४६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. मात्र, काम पूर्ण करण्यासाठी आणखी निधीची आवश्यकता भासल्यास त्यासाठी कोणालाही विनंती करण्याची गरज नाही. पुतळा व स्मारकाचे काम दर्जेदार आणि भव्य स्वरूपात पूर्ण करण्यासाठी जेवढा निधी आवश्यक असेल तेवढा उपलब्ध करून देण्यात येईल. या कामासाठी एक रुपयाही कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही गोरे यांनी दिली.
याच चौकात भव्य भगवा ध्वज उभारण्यात यावा, अशी सूचनाही पालकमंत्री गोरे यांनी केली. त्यासाठी लागणारा स्वतंत्र निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सावंत बंधूंची इच्छा आज पूर्ण झाली
छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आपल्या हस्ते व्हावे, अशी सावंत बंधूंची अनेक दिवसांपासून इच्छा होती. आज हा योग प्रत्यक्षात आला असून त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे सांगत पालकमंत्री गोरे यांनी सावंत बंधूंचे कौतुक केले.
ते म्हणाले, “त्यांना माहिती आहे की पालकमंत्री निधी कमी पडू देणार नाही. सुनील बापू सावंत  पहिलवान गडी असला तरी डोक्याने फार हुशार आहे. करमाळा शहराच्या विकासासाठी सर्वांना बरोबर घेऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन समारंभाला एकत्र करून संघटन कौशल्याचे अनुकरण केले आहे.”
करमाळा शहराच्या विकासासाठी विविध राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय घटकांना सोबत घेऊन काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. त्याच पद्धतीने शहराच्या विकासासाठीही सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
पाणीप्रश्न सोडविण्यासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही
करमाळा शहर व तालुक्यातील पाणीप्रश्नाबाबतही पालकमंत्री गोरे यांनी आश्वासन दिले. शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. शहरातील विकासकामे, रस्ते तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांसाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेली आश्वासने विसरणार नसून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कुठेही कमी पडणार नाही, असे सांगताना गोरे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन पांडुरंगाची सेवा करण्याची आपली इच्छा होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाने ही संधी दिली असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न राहील.
नगराध्यक्षा मोहिनी सावंत यांनी करमाळा शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अल्पावधीत उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते आणि अन्य नागरी सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्याचे त्यांनी पालकमंत्री गोरे यांच्या निदर्शनास आणून दिले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्यामुळे करमाळा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. भूमिपूजनस्थळी भव्य भगवा मंडप उभारण्यात आला होता. शिवप्रेमींच्या गळ्यात भगवे गमजे, हातात भगवे झेंडे आणि कपाळावर भगवा गंध असे उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. कुदळ आणि टोपलीदेखील भगव्या रंगात सजविण्यात आली होती.
स्वयंस्फूर्तीने हजारो शिवप्रेमींनी उपस्थित राहून भूमिपूजन सोहळ्यात सहभाग घेतला. यावेळी निर्भया पथक, पुणे यांच्या वतीने पथनाट्य सादर करण्यात आले. शिवस्मारकासाठी लोकवर्गणीच्या माध्यमातून योगदान देणाऱ्या नागरिकांचेही पालकमंत्री गोरे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरपरिषदेचे गटनेते दीपक चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी केले, तर आभार सोमनाथ सरवदे यांनी मानले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!