जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करमाळा मतदार संघातील प्रश्न मांडणार-आमदार नारायण आबा पाटील
करमाळा प्रतिनिधी आमदार नारायण आबा पाटील उद्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करमाळा मतदार संघातील प्रश्न मांडणार असून पारेवाडी सबस्टेशन सक्षमीकरणासह अनेक कामांबाबत मागणी करणार असल्याचे आमदार कार्यालयाकडून सांगण्यात आले. उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत आमदार नारायण आबा पाटील हे उपस्थित राहुन काही महत्वाचे प्रश्न मांडणार आहेत. मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार नारायण आबा पाटील यांनी कुर्डुवाडी शहर पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आवाज उठवला होता. सदर प्रश्न बैठकीत मांडल्याने जिल्हाधिकारी यांचेकडून सोडवण्यासाठी हाती घेण्यात आला. आता उद्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत करमाळा तालुक्यातील पारेवाडी येथील ३३/११ केव्ही उपवीज केंद्रात पाच एम व्ही ए क्षमतेचा एक अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी आमदार पाटील यांच्या कडून केली जाणार आहे.
तसेच करमाळा कृषी विभागाच्या वतीने महाडीबीटी योजनेतील अर्जदार शेतकऱ्यांना अवजारे लाभ देण्यासाठी सोडत झाली नाही याबाबत विचारणा केली जाणार आहे. कुंभेज येथील मंजूर असलेल्या ३३/११ केव्ही उपवीज केंद्राची उभारणी प्रक्रिया संथगतीने चालू असल्याने यावर आमदार नारायण आबा पाटील प्रकाश झोत टाकणार आहेत. कृषी विभागाच्या तुषार सिंचन/ ठिबक सिंचन योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना अजून अनुदान दिले गेले नसल्याने हा प्रश्न मांडला जाणार आहे.उजनी पर्यटन विकास कामाची अजून सुरवात न झाल्याने हा प्रश्न मांडला जाईल. तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टेल कडील ४.७०० किमी चारीचे रुंदीकरण पाहिजे तेवढे झाले नसल्याने या भागात पाणी देताना अडचणी निर्माण होत असल्याने हा प्रश्न मांडला जाईल. यासह इतर काही महत्वाचे प्रश्न आमदार नारायण आबा पाटील यांच्या वतीने मांडले जातील तसेच याबाबत लेखी निवेदने पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिले जातील असे आमदार कार्यालयाकडून
सांगण्यात आले आहे.


