शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावुन घेण्यासाठी वीजपुरवठा खंडित केल्यास तीव्र आंदोलन करणार: राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष भरत भाऊ आवताडे*
करमाळा : प्रतिनिधी – सीना-कोळगाव जलाशयातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याच्या उद्देशाने काही गावांतील शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रस्ताव असल्याचे समोर आले आहे. “वीजपुरवठा खंडित करून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू,” असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य भरत भाऊ आवताडे यांनी दिला. शेतकऱ्यांची उभी पिके अंतिम टप्प्यात असताना वीजपुरवठा बंद करण्याऐवजी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली.
सीना-कोळगाव जलाशयातील पाणी नियोजनाच्या पार्श्वभूमीवर करमाळा तालुक्यातील आवाटी,गोंडरे, निमगाव, कोळगाव, हिवरे, हिसरे आणि अर्जुननगर या गावांमधील विद्युत मोटारींचा वीजपुरवठा खंडित करण्याचा प्रस्ताव असल्याचे संबंधित कागदपत्रांमधून दिसून येत असल्याचे भरत भाऊ आवताडे यांनी सांगितले. या प्रस्तावामुळे संबंधित गावांतील शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
सध्या अनेक शेतकऱ्यांची पिके वाढीच्या तसेच काढणीच्या अंतिम टप्प्यात आहेत. पिके उभी करण्यासाठी शेतकऱ्यांनी बी-बियाणे, खते, औषधे, मशागत, मजुरी आणि सिंचनावर मोठा खर्च केला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कष्ट करून उभी केलेली पिके आता उत्पादनाच्या टप्प्यावर आली असताना शेतीपंपांचा वीजपुरवठा बंद झाल्यास पिकांना आवश्यक पाणी देणे अडचणीचे होऊ शकते. त्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याची गरज आहे, याबाबत मतभेद नसले तरी त्यासाठी शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान होईल, असा निर्णय घेऊ नये, असे आवताडे यांनी म्हटले आहे.जलाशयातील उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करून पिण्याच्या पाण्याची गरज भागवावी आणि त्याचवेळी शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याचेही योग्य नियोजन करावे, अशी मागणी त्यांनी केली.
“शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने आणि खर्च करून पिके उभी केली आहेत. अंतिम टप्प्यात पाणी न मिळाल्यास संपूर्ण हंगामातील मेहनत वाया जाऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती समजून घेऊन निर्णय घ्यावा,” असे आवताडे यांनी सांगितले.
संबंधित गावांमधील पीक परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेऊन प्रशासनाने शेतकऱ्यांशी संवाद साधावा. उपलब्ध पाण्याचे शास्त्रीय पद्धतीने नियोजन करून पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्यासोबतच शेतीचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी पर्यायी उपाययोजनांचा विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास संबंधित शेतकरी लाभधारकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भरत आवताडे यांनी दिला. त्यामुळे सीना-कोळगाव जलाशयातील पाणी नियोजनाच्या प्रश्नावर प्रशासन कोणता निर्णय घेते, याकडे संबंधित गावांतील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


