Wednesday, November 25, 2026
Latest:
Uncategorized

उजनीत एआय डेटा सेंटर नकोच; काँग्रेसचा घंटानाद! साहेबराव वाघमारे यांचा सरकारला इशारा; तहसील कार्यालयासमोर आंदोलन

 

करमाळा (प्रतिनिधी) : उजनी धरण परिसरात प्रस्तावित एआय डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक शेतकरी, शेतमजूर, धरणग्रस्त, मच्छीमार आणि नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, असा ठाम इशारा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे यांनी दिला. या मागणीसाठी सोमवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी करमाळा तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

यावेळी बोलताना साहेबराव वाघमारे म्हणाले की, सोलापूर जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो. उजनी धरणातील पाणीसाठा शेती व पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचा असताना अनेक गावांना आजही नियमित पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असणारा एआय डेटा सेंटर प्रकल्प उजनी परिसरात आणण्याचा अट्टहास कशासाठी? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमचा विकासाला विरोध नाही; मात्र विकासाच्या नावाखाली शेतकरी, शेती, पर्यावरण आणि स्थानिक नागरिकांचे भविष्य धोक्यात येणार असेल, तर असा प्रकल्प आम्हाला मान्य नाही. मुबलक पाणीसाठा असलेल्या ठिकाणी हा प्रकल्प उभारावा. स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर गदा आणणारा कोणताही निर्णय सरकारने लादू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

उजनी धरणात येणाऱ्या पाण्याच्या प्रदूषणाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक घटकांमुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त करत, प्रस्तावित प्रकल्पामुळे पर्यावरण, शेती, मानवी आरोग्य आणि जलचर सृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो, असे ते म्हणाले.

सरकारने लोकशाही आणि संविधानाचा आदर करून स्थानिकांच्या भावना समजून घ्याव्यात. शेतकरी आणि निसर्ग वाचला तरच देश समृद्ध राहील. त्यामुळे उजनी धरण परिसरातील एआय डेटा सेंटर प्रकल्प तातडीने रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही वाघमारे यांनी दिला.

यावेळी भीम आर्मीचे अध्यक्ष उत्तरेश्वर कांबळे, राष्ट्रवादीचे सरचिटणीस संतोष वारे, उजनी धरण समितीचे अविनाश सरडे, मार्केट कमिटीचे माजी सभापती शिवाजी बंडगर, उदय देशमुख, तुकाराम घोंगडे आदींनीही उजनी बचावासाठी भूमिका मांडली.

आंदोलनावेळी ओबीसी तालुकाध्यक्ष गफूरभाई शेख, मुस्ताकीम पठाण, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष अशोक वाघमोडे, जैन्नुदिन शेख, संभाजी शिंदे, प्रशांत उघडे, ईन्नुस शेख, अभि उघडे, शिवाजी शिंदे, भावना गांधी, कोमल लालबेग, सारिका कांबळे, हणमंत चांदणे, जनार्दन उबाळे, जय कांबळे, महेश चांदणे, करण आवटे, कपिल देडगे, दयाराम भोसले, मिलिंद भोसले, शहाजी डुकळे, निलेश चांदणे, नितीन आरणे, दादा आरणे, गोरख गायकवाड, विष्णू आखाडे, रामा पांडव, सचिन कांबळे, संतोष चव्हाण, शहाजी अवचर, इक्बाल शेख, हणमंत पवार आदींसह शेकडो महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

error: Don\'t try to copy. Content is protected !!