आदिनाथ कारखाना चालविण्यास बारामती ॲग्रोच सक्षम बचाव समितीने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये-राजेंद्र बारकुंड
करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा करार बारामती अॅग्रो बरोबरच झाला असून, हा कारखाना बारामती अॅग्रो चालविण्यास सक्षम व पात्र आहे. दुसरे कोणीही हा कारखाना चालवू शकत नाही. एवढेच नाहीतर वर्गणी करून कोणताही साखर कारखाना चालू होवू शकत नाही. त्यामुळे बचाव समितीने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल करून फसवणूक करू नये; असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी केले आहे.. पुढे बोलताना ते म्हणाले, की आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालू करण्याबाबत गेल्या महिन्यापासून बचाव समितीची प्रक्रिया चालू झाली आहे. बचाव समितीला कोणतीही कायदेशीर बाजू नाही तसेच कोणतीही घटनात्मक तरतूद नाही. सभासदामधून व अन्य मार्गाने वर्गणी गोळा करून आदिनाथ साखर कारखाना चालू होवू शकत नाही. आदिनाथ कारखान्याची आर्थिक परिस्थिती व मशिनरीची दुरावस्था पाहता व तालुक्यातील राजकारण या सर्व बाबीमुळे हा कारखाना वर्गणी गोळा करून चालविणे शक्य नाही.
बचाव समिती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना चुकीची माहिती देऊन आदिनाथ कारखाना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. आता बारामती अॅग्रो हा कारखाना चालू करण्याच्या वेळेस बचाव समितीची आडकाठी ठरणार आहे. जर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊसाचा प्रश्न सोडवायचा असेल व आदिनाथ व्यवस्थित चालवायचा असेलतर बारामती अॅग्रो शिवाय पर्याय नाही. तालुक्यातील कोणीही व्यक्ती, संस्था अथवा राजकीय गट हा कारखाना चालवू शकत नाही. जर त्यांना चालवायचा असतातर त्यावेळेस बँकेबरोबर करार होवू दिला नसता. तसेच ज्यावेळेस बँकेने टेंडर काढले त्यावेळेसच तालुक्यातील आदिनाथची खरीच चाड असणाऱ्या व्यक्तींनी टेंडर भरले असते व कारखाना चालविण्याची भुमिका घेतली असती.
ही वेळ निघून गेल्यानंतर मात्र आदिनाथ बचावची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. २० मार्च रोजी आदिनाथची ऑनलाइन वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. या सभेत सभासदांनी बारामती अॅग्रोनेच हा कारखाना चालवावा; असा ठराव घ्यावा. असे सांगून श्री.बारकुंड म्हणाले, की बचाव समितीच्या बातम्यामुळे तालुक्यातील शेतकरी संतप्त झाला असून त्यांनी बचाव समितीचा निषेध केला आहे. एनसीडीसी बँक व एनएमएससी बँक यांच्या काही गोष्टीमुळे एनसीडीसी बँकेत बारामती ॲग्रोकडे कर्जाविषयी कोणतीही गाईडलाइन दिली नसल्यामुळे आदिनाथ कारखाना चालू करण्यास विलंब झाला आहे. बारामती ॲग्रो लवकरच हा कारखाना चालू करण्याविषयी पुढाकार घेत असून बारामती अॅग्रोच हा कारखाना चालवूशकतो; असाही विश्वास श्री.बारकुंड यांनी व्यक्त केला आहे.
