लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लीट. पदवीने सन्मान होत असल्याबद्दल करमाळा शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमीत आनंदोत्सव
‘एमजीएम’ विद्यापीठाचा पहिला दीक्षांत समारंभ रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. ‘एमजीएम’ हे मराठवाड्यातील पहिले स्वयंअर्थसाहाय्यित खासगी विद्यापीठ आहे. पद्मविभूषण शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. ‘एमजीएम’च्या रुक्मिणी सभागृहात रविवारी हा दीक्षांत सोहळा पार पडेल.
या समारंभात विद्यापीठाकडून पहिली डी. लिट पदवी समाजसेवक, साहित्यिक, विचारवंत अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर जाहीर करण्यात आली आहे. त्यांच्या स्नुषा सावित्रीबाई मधुकर साठे ही पदवी स्वीकारतील, अशी माहिती कुलपती अंकुशराव कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
अण्णा भाऊ साठे यांची साहित्यसंपदा विपुल आहे. त्यांचे सामाजिक कार्य आमच्यासाठी सदैव आदर्श आहे. ‘एमजीएम’ विद्यापीठाची पहिली डी.लिट. पदवी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना प्रदान करताना आम्हाला अभिमान वाटतो, अशी भावना कुलपती अंकुशराव कदम यांनी व्यक्त केली आहे.
या पहिल्या दीक्षांत समारंभामध्ये ‘एमजीएम’ विद्यापीठातून २०२० ते २०२२ या शैक्षणिक वर्षांदरम्यान विविध अभ्यासक्रमांतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाईल. यामध्ये पदवीधर १०९ पदव्युत्तर पदवीधर २९१ पदविकाधारक १३१ आणि प्रमाणपत्रधारक ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. -कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर.या पत्रकार परिषदेला कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, अधिष्ठाता डॉ. रेखा शेळके यांची उपस्थिती होती. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर डी.लीट. पदवी प्रदान होत असल्याबद्दल करमाळा शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते युवराज नामदेव जगताप यांनी आनंद व्यक्त केला आहे.