येत्या मकर संक्रांतीला विधवा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करा- प्रमोद झिंजाडे
करमाळा प्रतिनिधी हिवरवाडी ता.करमाळा येथील शेतकरी श्री गोविंद पवार व सौ. सविता गोविंद पवार यांनी ३० डिसेंबर रोजी खुरपणी करणाऱ्या महिलांसाठी विधवा प्रथाबंदी संदर्भात प्रबोधन व्हावे या उद्देशाने विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियनाचे जनक व महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद झिंजाडे यांच्या मार्गदर्शनपर संवादाचे आगळेवेगळे आयोजन करून एक अनोखा आदर्श निर्माण केला. हिवरवाडीच्या शिवारात सोमनाथ चिवटे यांच्या वस्तीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून हिवरवाडीच्या ससंच सौ. अनिता बापू पवार, प्रा. प्रदीप मोहिते, श्री. मधुकर पवार आणि सौ. सुक्षा बाळू पवार हे मान्यवर आणि जि. प. प्राथमिक शाळा हिवरवाडी च्या विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
प्रथम सर्व मान्यवरांचे गोविंद पवार आणि सविता पवार यांनी स्वागत केले. प्रा प्रदीप मोहिते यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रमोद झिंजाडे यांना विधवाप्रथा बंदी अभियानाच्या क्रांतिकारक कार्याचा गौरव म्हणून महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.
प्रमोद झिंजाडे यांनी उपस्थित शेतकरी कष्टकरी महिलांना विधवा महिला सन्मान व संरक्षण कायदा अभियानाची माहिती व अनुभव सांगितले व विधवा महिलांची होणारी सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमातील कुचंबना सांगितली तेव्हा उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले. या वेळी झिंजाडे यांनी येत्या संकातीला हिवराडी ग्रामपंचायतीने विधवांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात यावा असे आवाहन केले. हिवरवाडीच्या सरपंच अनिता पवार यांनी सदर कार्यकम आयोजित करण्याचे अभिवचन दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुप्रिया पवार या महाविद्यालयीन विद्यार्थिनीने केले.
