पोथरे येथील शेतकऱ्यांना अतिवृष्टीची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी
करमाळा प्रतिनिधी करमाळा मंडळ अंतर्गत (आताचे पोथरे मंडळ) असलेल्या गावातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या नुकसानीची भरपाई द्या,’ अशी मागणी पोथरे येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार समीर माने यांच्याकडे केली आहे. नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी हे निवेदन स्वीकारले. मंगळवारी (ता. २८) हे निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनावर बळीराजादलचे हरिभाऊ हिरडे, शिवरत्न मित्रमंडळाचे अध्यक्ष हरिश्चंद्र झिंजाडे, रघुवीर जाधव, आबासाहेब झिंजाडे, ज्ञानदेव नायकोडे, बाळासाहेब खराडे आदींसह २५ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अतिवृष्टीमुळे करमाळा मंडळातील गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले. मात्र आता आलेल्या मदतीमध्ये या मंडळाचा समावेश झालेला नाही. अतिवृष्टी धारक पीडित शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. नुकसान भरपाई मिळावी म्हणून पाऊस झाला तेव्हा पिकांचे पंचनामे करण्यात आले होते. तरीही मदत मिळत नसेल तर दुर्दैवी बाब असल्याचे म्हटले आहे.
