Uncategorized

देशाच्या प्रगतीमध्ये अभियंत्याची भुमिका महत्वाची: डॉ. हेमंत अभ्यंकर


भिगवण, ता. १६
अभियंता हा खऱ्या अर्थांने नवनिर्माता असतो त्यांने कायम नाविन्याची कास धरली पाहिजे. कोणत्याही देशाच्या प्रगतीमध्ये अभियंत्याची भुमिका महत्वाची असते. अभियंत्यांनी गुणात्मक वाढीसाठी प्रयत्न केल्यास वैयक्तिक प्रगतीबरोबरच व देशाच्या प्रगतीमध्येही अभियंते महत्वपुर्ण भुमिका निभाऊ शकतात असे प्रतिपादन पुणे येथील विश्वकर्मा संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. हेमंत अभ्यंकर यांनी केले.
स्वामी चिंचोली(ता.दौंड) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टीटयुशन्स येथे अभियंता दिन व विदयार्थी स्वागत समारंभामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ होते तर प्रा. चित्तरंजन महाजन, दत्तकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष राणादादा सूर्यवंशी, सचिव प्रा. माया झोळ, प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर, प्राचार्य अप्पासाहेब केस्ते, संचालक डॉ. शरद कर्णे, उपप्राचार्य प्रा. श्रीकांत साळुंखे उपस्थित होते. डॉ. अभ्यंकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना आनंद घेणे महत्त्वाचे आहे. अलीकडच्या आर्थिक कारणांने शिक्षण थांबले असे होत नाही. स्वावलंन किंवा शैक्षणिक कर्जे असे पर्याय सध्या उपलब्ध आहेत त्याचा योग्य विनियोग केल्यास शिक्षणाच्या माध्यमातून जीवनामध्ये यशस्वी होता येते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ म्हणाले, अभियंता हा मानवी जीवनातील अडचणींवर मार्ग काढत असतो आणि यासाठी अभियांत्रिकीचे शिक्षण हे सर्वात जास्त उपयुक्त ठरते. चांद्रयान मोहीमेमध्येही अभियंत्यांनी महत्वपुर्ण भुमिका निभावली. यावेळी चित्तरंजन महाजन यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अप्पासाहेब केस्ते यांनी प्रास्ताविक केले सुत्रसंचालन प्रा. स्मिता विधाते, प्रा.पल्लवी सुळ यांनी केले तर आभार प्रा.संतोष काठाळे, यांनी मानले. कार्यक्रमासाठी दत्तकला शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक, कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group