रेल्वे विभागाने जेऊर ,केम नंतर थांब्यासाठीआता पारेवाडी रेल्वे स्टेशनला प्राधान्य द्यावे .- ॲड. अजित विघ्ने यांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेकडे मागणी
करमाळा प्रतिनिधी केंद्रीय रेल्वे विभागाने मध्य रेल्वे च्या जेऊर, केम तसेच माढा येथील रेल्वे प्रवाशांचे मागणीचा विचार करून संबधित स्टेशनवर आवश्यक त्या रेल्वे गाडयांना थांबा दिलेला आहे. परंतु सन-१९९७ पासुन आमचे प्रवासी बांधव व ग्रामस्थ वारंवार पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाडीला थांबा मागणी करूनही रेल्वे कडुन सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. आजपर्यंत एकदा रेल्वे रोको आंदोलन यासह एल्गार मोर्चा देखिल झाला आहे. पारेवाडी स्टेशन व परिसरातील ३० गावातील ग्रामपंचायतींनी पारेवाडी स्टेशनवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळणे बाबतचे ठराव संमत करून रेल्वे विभागाला दिले आहेत. आजपर्यंत झालेल्या सर्व रेल्वे मंत्री आणि खासदार महोदयांना मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. याबाबत विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पारेवाडी रेल्वे स्टेशनवर एक तरी एक्सप्रेस गाडी थांबवणारच असे ठोस आश्वासन देखिल शिष्टमंडळाला दिलेले आहे, तरीही अद्याप पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळालेला नाही. जेऊर तसेच केम, माढा स्टेशनला अनेक गाडयांना थांबा मिळाला आहे परंतु पारेवाडी रेल्वे स्थानक व परिसरातील प्रवाशांचे मागणीचा विचार अद्यापही का होत नाही. सर्व प्रवाशांना समान न्याय देण्याची भुमिका लोकप्रतिनिधी आणि रेल्वे मंत्रालयाने घ्यायला हवी. आमचे पारेवाडी रेल्वे स्टेशन पासुन जेऊरला बाय रोड ५० कि.मी जाऊन येऊन अंतर कापावे लागते, तर भिगवण ला देखिल६० कि.मी अंतर कापावे लागते. त्यामुळे शाळकरी मुले, वृद्ध, महीला प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत. फक्त जेऊर आणि इतर स्टेशनलाच गाडया थांबविण्या बद्दल आमचे काही मत नाही परंतु, पारेवाडी रेल्वे स्टेशन व परिसरातील प्रवाशांची असणारी मागणी तातडीने पुर्ण व्हावी अशी मागणी ॲड. अजित विघ्ने यांनी केली आहे.
