Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळाकृषी

बनावट खत प्रकरणाची सी.आय.डी .मार्फत चौकशी करण्याची दिग्विजय बागल यांनी केली कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांच्याकडे मागणी.

करमाळा प्रतिनिधी                                      पोटॅश खताचे बनावट प्रकरण ताजे असतानाच  आता महाधनचे १९:१९:१९ हे बनावट खत आपल्याच तालुक्यात विक्री केल्याचे सापडले आहे. बनावट खत विक्रीचे प्रमाण वाढत असताना त्यांचा सर्वाधिक फटका तालुक्याला बसत आहे. सदर प्रकरणात कृषी विभागाने गुन्हे दाखल केले असले तरी या मागे खूप मोठी टोळी असल्याचे दिसत आहे. तरी या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्यात यावी अशी मागणी मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते दिग्विजय बागल यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.       मांजरगाव (ता.करमाळा) येथील परिसरातील पाच शेतक-यांनी वाशिंबे येथून महाधनाचे १९:१९:१९ हे खत घेतले होते. सदर खत बनावट असल्याचे शेतक-यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी कृषी विभागाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी कृषी विभागाने गुन्हे ही दाखल केले आहेत परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतक-यांचे नुकसान होत आहे. आपल्याकडे ग्रामीण भाग जास्त असल्यामुळे कोणते खत प्रमाणित कंपनीचे आणि बनावट यामधील फरक अजून ही शेतक-यांना समजत नाही. याबाबत कृषी खात्याने याची जनजागृती करणे आवश्यक आहे. मागील प्रकरणात ही आपण बनावट खताची दखल घ्यावी असे सांगितले होते तरी ही बनावट खत विक्री करणा-यांची टोळी अजूनही तालुक्यात कार्यरत आहे ही गंभीर बाब आहे. आज १९:१९:१९ या खात्याची एक गोणी घ्यायची म्हटले तरी २३०० रुपये किंमत आहे, हे जर बनावट असेल तर शेतक-यांना परवडणार कसे. आधीच शेतक-यांच्या खिशात या कोरोनामुळे पैसा राहिला नाही. शेतक-यांची परिस्थिती अशी हलाखीची असताना पदरमोड करुन जर बनावट खते मिळत असतील तर त्यांची सीआयडी चौकशी करुन त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी दिग्विजय बागल यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे. मागील बनावट खतांचे प्रकरण लक्षात घेऊन कृषी विभागाने सर्तक राहणे गरजेचे होते. आता परत करमाळा तालुक्यात १९:१९:१९ हे बनावट खत आढळले. यामध्ये मुळात शेतक-यांचे खूप मोठे नुकसान होत आहे. त्याला ना विक्रेत्यांकडून भरपाई मिळते ना कंपन्याकडून. त्यामुळे तालुक्यात जी बनावट खत विक्री करण्याची  टोळी त्यांची सीआयडी चौकशी करुनच हे प्रकरण मार्गी लावावे अशी मागणी आपण कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे. 

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group