Friday, April 25, 2025
Latest:
करमाळा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाने पुढे ढकलल्या. नोव्हेंबरमध्ये निवडणूका होण्याची शक्यता

करमाळा प्रतिनिधी जम्मू आणि काश्मीरसह हरियाणा विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करताना महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रकही शुक्रवारी १६ ॲागस्टला जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी सविस्तर माहीती दिली. यावेळी त्यांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यात मतदान होणार असून 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर असे तीन टप्पे असतील तर हरियाणामध्ये एकाच टप्प्यात म्हणजे 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तसेच या राज्यांची मतमोजणी ४ ऑक्टोबरला होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
दरम्यान, उत्तरेकडील दोन राज्यांसह महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीचेही वेळापत्रक जाहीर होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अनेक कारणांचा दाखला देत महाराष्ट्रातील निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. या निवडणुका या वर्षाच्या शेवटी किंवा नोव्हेंबर महिन्यांमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या वेळी बोलताना मुख्य निवडणुक आयुक्त राजीव कुमार यांनी, “2019 च्या ऑक्टोबरमध्ये हरियाणा आणि महाराष्ट्र राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका एकत्र घेतल्या गेल्या त्यावेळी आमच्याकडे जम्मू आणि काश्मीरच्या निवडणुकांचा भार नव्हता. यावर्षी निवडणुक आयोग जम्मु आणि काश्मिरमध्ये तीन टप्प्यांत मतदान घेत आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर मानवी आणि तांत्रिक संसाधनांची गरज भासणार आहे.” असे कारण त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी, “यावर्षी सुरवातीपासूनच आम्ही निवडणुका घेतल्या आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकांशिवाय, आम्ही ४ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका घेतल्या आहेत. त्यामुळे निवडणुक कर्मचारी तणावाखाली येऊ नयेत यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” असेही कारण त्यांनी सांगितले.महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकींच्या तयारीसाठी थोडा वेळ लागणार आहे. पावसामुळे स्थानिक पातळीवरील अनेक कामे पूर्ण करायची असून त्याला पावसामुळे आधीच उशीर झाला आहे. याशिवाय, गणेशोत्सव, नवरात्री आणि दीपावली असे अनेक सण तोंडावर असून महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यासाठी वेळापत्रकानुसार काम करावे लागणार असल्याचा खुलासा मुख्य निवडणुक आयुक्तांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group