करमाळा

आवडत्या गणपती बाप्पाच्या आगमनानंतर लक्ष्मीच्या पावलांनी आली गौराई

केत्तुर प्रतिनिधी अभय माने आवडत्या बाप्पाच्या आगमनानंतर तिसऱ्या दिवशी गौरीची आगमन होते त्यानुसार मंगळवार (ता.10) रोजी सकाळपासूनच गौरी आगमनाची आणि त्यांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्यासाठी महिला मंडळी तसेच घरातील तरुणींची लगबग दिसत होती. लाडक्या गणराया पाठोपाठ लाड पुरवून घेण्यासाठी माहेरवाशीण गौराईचे घरोघरी धुमधडाक्यात व आनंदात व उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.सर्वांच्या कुशल मंगलाची प्रार्थना यावेळी करण्यात आली.

गौरी आगमनाचा मुहूर्त संध्याकाळी 8.02 मिनिटापर्यंत असल्याने यापूर्वीच सायंकाळीच गौरींचे आगमन झाले. कोण आली..लक्ष्मी आली…सोन्या रुप्याच्या पावलांनी लक्ष्मी आली..हळदी कुंकवाच्या पावलांनी लक्ष्मी आली…असे म्हणत करमाळा शहरासह ग्रामीण भागात परिसरात महालक्ष्मी अर्थात ज्येष्ठा गौरी व कनिष्ठा गौरींचे मोठ्या आनंदात व उत्साहात आगमन झाले.यावेळी बच्चे कंपनी मोठा उत्साह दिसून येत होता.मंगळवारी गौरी आवाहनाचा मुहूर्त होता आज आमंत्रण.. उद्या जेवायला या… असा निरोप महिला भगिनींनी गौराईला दिला.त्यानंतर विधिवेतपणे मखरामध्ये जेष्ठा गौरी तसेच कनिष्ठा गौरी स्थानापन्न करण्यात आल्या.पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य,आकर्षक विद्युत रोषणाई,विविध प्रकारची फळे,फुले,विड्याची पाने,भाज्या आदींना मोठी मागणी होती.पारंपरिक गीते गात मोठ्या थाटामाटात गौराईंचे स्वागत करण्यात आले. लक्ष्मीच्या पावलीने आलेल्या गौराईची वाजत गाजत पूजन करून घरात स्थापना करण्यात आली.आगमन झाल्यानंतर त्यांना संपूर्ण घरात गौराईचे मुखवटे फिरण्यात येतात गौराई सोबत त्यांची लहान बाळ देखील ठेवली जातात.गौराईभोवती छोटा मंडप उभारून त्यामध्ये सजावट केली जाते.माहेरवाशीणला नव्या साड्या,दागिने तसेच आकर्षक विद्युत रोषणाईने सजविले जाते.त्यांचे समोर विविध प्रकारची फळे,धान्य,शेतातील ताजी पिके नैवेद्य,विविध प्रकारची आकर्षक खेळणी मांडली जातात.बुधवार दिवसभर लक्ष्मी ( गौराई) पाहणे,दर्शन घेण्यासाठी शेजारीपाजारी तसेच मित्रपरिवार येणार आहेत.व त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरीचे विधिवत विसर्जन होणार आहे.या सणाचा समाजमाध्यमात शुभेच्छा देण्यासाठी तरुणांची लगबग सुरू होती.आपआपल्या घरी प्रतिष्ठापना केलेल्या गौरीचे सजावटीचे छायाचित्र व्हाट्सअप,फेसबुकवर पाठविले जात होते.हा कलासंगत बदल व त्याची व्याप्ती या सणाचे लोकमनात असलेले स्थान अधोरेखित करीत आहे.

छायाचित्र: केत्तूर (ता.करमाळा):बाप्पांच्या आगमनानंतर मंगळवारी गौरीचे उत्साहात आगमन झाले. गौरीला घरात आणताना महिला मंडळी.(छायाचित्र राजाराम माने,केत्तूर)

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group