यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्यावतीने प्रियांका गायकवाड यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान
करमाळा प्रतिनिधी:- श्रध्येय वसंतरावजी दिवेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष प्रा गणेश करे पाटील यांनी वक्तृत्व स्पर्धा व विविध क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्याना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले.
या पुरस्कारामध्ये मागील अनेक वर्षापासून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र झटणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेनेच्या तालुका प्रमुख प्रियांका गायकवाड यांना यशकल्याणी संस्थेच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील, डॉ. प्रचिती पुंडे, डॉ. सुनिता दोशी यांनी गायकवाड यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी करे पाटील म्हणाले की, प्रियांका गायकवाड यांचे कार्य लोकाभिमुख असून आजपर्यंत त्यांनी सामाजिक कार्यातून मुलींसाठी स्वसरंक्षण शिबिरे, लाठी काठी प्रशिक्षण राबविले असून निराधार महिलांना, अपंगांना त्यांचे हक्काचे लाभ मिळवून दिले आहेत तसेच वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक रुग्णांना आर्थिक मदत मिळवून दिली आहे. त्याच प्रमाणे शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत मिळवून देऊन त्यांनी खऱ्या अर्थाने वंचित महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे सामाजिक योगदान अतुलनीय असून करमाळ्यातील महिलांसाठी गायकवाड यांनी यापुढे आणखी भरीव कामगिरी करावी असे आवाहनही यावेळी करे पाटील यांनी केले.
तसेच पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर गायकवाड म्हणाल्या की, करे पाटील यांनी हा पुरस्कार देऊन माझ्या कार्याची पोचपावती दिलेली आहे. तसेच या कौतुकाच्या बळावर आणखी सामाजिक कार्य करण्यासाठी बळ मिळाले असून यापुढे आणखी जोमाने कार्य करणार आहे. महिलांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी निर्माण होतात परंतु त्यावर मात करून पुढे जाण्यासाठी योग्य मार्ग शोधणे गरजेचे आहे. यासाठी प्रत्येक महिला सक्षम होण्यासाठी मी प्रयत्न करणार असून त्यासाठी वेळोवेळी महिलांमध्ये जनजागृती होण्यासाठी कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे ही यावेळी गायकवाड यांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तसेच बहुसंख्य महिला वर्ग उपस्थित होता. समाजरत्न पुरस्कार मिळाल्यानंतर गायकवाड यांचे सोशल मीडिया वर अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच अनेकांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.
