महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी संमेलन एक सुखद झुळुक
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची नसते. अशीच संधी आमच्या व्हाट्सअँप ग्रुपचे स्टार श्री. सचिन साखरे याने दिनांक 1/12/24 रविवारी उपलब्ध करून दिली. सचिन चे करमाळ्यात नामांकित मेडिकल स्टोर आहे. त्याच्या मुलाचे लग्नाचे निमित्ताने करमाळा येथे 1979 साली दहावी अ तुकडीतील मित्र, मैत्रिणींचा स्नेहमेळावा आयोजित केला.
पुण्याहून अनिल कोकिळ, दिनेश भंडारे, रवींद्र चव्हाण, रवींद्र जगताप, ललित बिनायकीया, सुनंदा जाधव ढेरे, संगीता शिंदे घावटे, अरविंद सोळंकी आले. तर अहिल्यानगर हुन सतिश कुलकर्णी, इचलकरंजी हुन सुरेंद्र दास यांनी हजेरी लावली.करमाळा स्थानिक मधून राजेंद्र महाजन, डॉ. राजेश शाह, सचिन साखरे, शिवलाल संचेती, नितीन शियाळ, डॉ.जयंत कापडी, विद्युलता झोळ-अडसूळे, निनाद चंकेशवरा, रत्नाकर हेबांडे, विठ्ठल भणगे असे एकूण 20 जण उपस्थित होतो.
रविवारी सकाळी सगळे जण 45 वर्षा नंतर भेटत होतो. त्यामुळे खुप उत्साह व आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होता.सकाळी 11 वाजता सर्व प्रथम सर्वांनी करमाळ्याच्या कमलाभवानी मातेचे दर्शन घेतले. व संगोबा रोडवर चिवटे यांच्या हॉटेलवर जमलो. खुप छान हॉटेल सजवले होते. आलेल्या सर्वांचे फेटे बांधून सत्कार करण्यात आला. 1979 ला आम्हाला शिकवणारे 86 वर्षीय आर. आर. मोरे सर व श्री. आर. एम. कुंभार सर यांना विशेष व प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आले. आमच्या वर्गातील दुःखद निधन झालेले कैलासवासी राजेंद्र शिंदे, दिलीप घोलप, दिलीप सोळंकी, शकील मुजावर, प्रकाश कोळेकर, बाळासाहेब शेलार, हेरंब पाठक ई. ज्ञात मित्रांना व शिक्षकांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रम सुरुवात झाली.सचिन साखरेने स्नेहमेळावा आयोजित करण्याचे यथोचित प्रास्ताविक केले.
स्वागत व सत्कार झालेनंतर सर्व विद्यार्थ्यांनी आपली ओळख करून दिली. सुख दुःखाचे प्रसंग सांगितले. कौटुंबिक पार्श्वभूमी ऐकून काही वेळेस मने हेलावली तर काही वेळेस समाधान पण देऊन गेले.आर. आर. मोरे सरांनी 86वर्षे जगण्याचे रहस्य ऐकून सर्व जणांना प्रेरणा मिळाली. त्यांनी नियमित पोषक व पचेल असा आहार, आनंदी राहणे व नियमित मेडिसिन घेणे ही त्रिसूत्री सर्वाना जमण्यासारखी आहे.असे अनुभवातून सांगितले.
डॉ.जयंत कापडी याने कठीण प्रसंगी फक्त मित्रच मदत करतात. अशी कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. राजेश ने ग्रामिण भागात वैद्यकीय व्यवसाय करताना माणुसकी व रुग्णसेवा हीच ईशसेवा असल्याचे आत्मविश्वासाने उदधृत केले. रवींद्र चव्हाण याने पर्यटन हेच निराशेचे उच्चाटन असल्याचे पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री. सुरेंद्र दास यांनी केले.
अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकाची चेष्टा करीत जुन्या आठवणी नी वातावरण आल्हाद दायी बनले होते.
चिवटे हॉटेल चे सुमधुर जेवणाचा आस्वाद घेऊन सर्वजण आमच्या महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे गेलो.
शाळेची ती इमारत पाहून किती समृद्ध शिक्षण दिले आम्हाला या इमारतीने याची जाणीव झाली.
दहावी ‘अ’ च्या त्यावेळेस च्या वर्गात पुन्हा एकदा आम्ही विद्यार्थी बनलो. श्री. कुंभार सर ही वर्गात आले. शाळेत असतानाचे ते दिवस, ते शिक्षक, ते शालेय बालपण, प्रसंग स्मृती आणि ज्यांनी हे सर्व जपले ते लहानपणीचे सवंगडी कधीच विसरू शकणार नाही.
जुन्या सगळ्या मधुर आठवणींना उजाळा मिळाला.
बिनदिक्कत पणे तोंड लावून
निशन्क मनाने ओंजळ धरून पाणी पिणारे त्यावेळेस चे ‘आम्ही’ पाण्याच्या टाकी ला बघून आज गहिवरून गेलो.
शाळेतल्या भिंतीवरील ‘निश्चयाचे बळ!तुका म्हणे तेचि फळ!!
दया,क्षमा, शान्ति तेथे देवाची वस्ती!
वृक्षवल्ली आम्हा सोयरी, दिनचरी!असे सुविचारांनी आयुष्य सुशोभीत केले.पाचवी ते दहावी असा केवळ सहा वर्षाच्या शालेय जीवनाने आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी दिली. उतराई होणे कठीण असलेले हे ऋण मनापासून मानावे आणि हा कायम आयुष्याचा सुखी पासवर्ड आहे हे अपडेट करून आम्ही शाळेचा निरोप घेतला.
आनंद वाटा व आनंद लुटा हे तत्व ठेऊन पुन्हा भेटत राहियचे असे सांगण्यासाठी विद्याने सर्वाना घरी प्रेमाने चहा पिण्यास नेले.
रियुनियन हा खरच खुप मोठा क्षण आहे. असे क्षण आपण वारंवार अनुभवत राहिलो तर आयुष्याच्या शेवटच्या टप्यात नविन शक्ती प्राप्त होतेच. आणि निर्भेळ आनंद प्राप्त होतो याची खात्री पटली. पुन्हा पुन्हा भेटून हा आनंद वृद्धिंगत करण्याचे निश्चित करून सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
कोणीतरी कवीने म्हणल्या प्रमाणे
निरोपाचा क्षण नाही
शुभेच्छा चा सण आहे,
पाऊल बाहेर पडताना
रेंगाळणारे मन आहे.
… इंजि.रवींद्र तुकाराम चव्हाण
पुणे
[email protected]
9423002870
3/12/2024