श्रीराम प्रतिष्ठान आयोजित करमाळ्यात आज सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न होणार – गणेश चिवटे
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी भव्य- दिव्य सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दि. १६ फेब्रुवारी २०२५ रोजी रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी, देवीचामाळ रोड, बायपास चौक, करमाळा येथे करण्यात आले आहे. अक्षता सोहळा सायं. ०६.२१ मि. या शुभमुहूर्तावर असून या विवाह सोहळ्यात २८ वधू-वर जोडपे विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गणेश चिवटे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, श्रीराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली दोन वर्षापासून आम्ही करमाळा तालुका व परिसरातील सर्व जाती धर्माच्या गोरगरीब, शेतकऱ्यांच्या मुला मुलींचे विवाह मोफत लावून देत आहोत. पहिल्या वर्षी २०२३ मध्ये २१ तर २०२४ मध्ये ३१ वधू-वरांचे विवाह आम्ही लावून दिले असून यंदाचे हे विवाह सोहळ्याचे तिसरे वर्ष आहे. करमाळा शहरातील मुख्य चौकातून सर्व नवरदेवांची घोड्यांवरून सवाद्य मिरवणूक (परण्या) काढण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने वधूला दोन साड्या, मनी मंगळसूत्र, पैंजण, जोडवे, बिछवे व चप्पल तर वराला दोन ड्रेस, बुट तसेच संसारोपयोगी पाच भांडी आणि विवाह सोहळा झाल्यानंतर शिदोरी देण्यात येणार आहे. सकाळी ११ ते सायं ५ या वेळेत २५ हजार पेक्षा अधिक वऱ्हाडींसाठी टेबल खुर्चीवर भोजन व्यवस्था केली आहे. या विवाह सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक व अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातील सर्वच मान्यवरांसह करमाळा तालुक्यातील माता-भगिनी, पुरुष, आत्पेष्ट व मित्र परिवार यांनी मोठ्या संख्येने नववधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित रहावे. असे आवाहन चिवटे यांनी शेवटी बोलताना केले.
हा भव्य दिव्य असा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, श्रीराम नागरी पतसंस्थेचे कर्मचारी, जी एन सी मिल्क सेंटरचे कर्मचारी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेत आहेत.श्रीराम प्रतिष्ठानकडून करमाळ्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.गेल्या १५ वर्षापासून करमाळा तालुक्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त २ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप, १३ वर्षापासून करमाळा शहरात शिक्षणासाठी राहणाऱ्या ग्रामीण भागातील १५० शालेय विद्यार्थ्यांना मोफत भात-भाजी वाटप, ८ वर्षांपासून अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून वृद्ध निराधार नागरिकांना दोन वेळचे मोफत डबे, गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर तसेच गणेश विसर्जन मिरवणूकीत कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस बांधवांना मोफत जेवण असे विविध सामाजिक उपक्रम श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने राबविले जात आहेत.
