Sunday, September 20, 2026
Latest:
Uncategorized

सावंत कुटुंबीयांकडून सालाबादप्रमाणे परंपरा कायम राखुन मुक्या प्राण्यांवर कृतज्ञता व्यक्त करुन बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी- करमाळा येथील सावंत कुटुंबीयांकडून सालाबादप्रमाणे परंपरा कायम राखुन मुक्या प्राण्यांवर कृतज्ञता व्यक्त करुन बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला आहे ग्रामीण महाराष्ट्राच्या संस्कृतीचं आणि परंपरेचा उत्सव असलेला बैलपोळा हा सण आधुनिक यांत्रिकीकरण आणि खर्चिक पालनपोषण यामुळे केवळ नावापुरताच राहीला असला तरी करमाळा शहरातील सावंत कुटुंबाकडून दरवर्षी जिवंत बैल जोड्या विकत घेऊन बैलपोळ्याची परंपरा कायम राखली आहे. यंदाच्या वर्षी सावंत कुटुंबाकडून सात बैलजोड्या विकत घेऊन बैलपोळा उत्साहात साजरा करण्यात आला. बैल पोळ्याच्या आदल्या दिवशी या बैलांचे खांदे गरम पाण्याने धुवून हळदीने खांदे मळणी करण्यात आली. पोळ्या दिवशी सकाळीच या पांढऱ्याशुभ्र बैलांना स्वच्छ अंघोळ घालून शिंगांना सोनेरी रंग लावला गेला. बैलांच्या अंगावर गुलाल टाकून शिंगांना बेगड लावल्या गेल्या. आणि नंतर सावंत यांच्या निवासस्थानापासून या सजवलेल्या बैलांची ढोल ताशा बँड पथक, संबळ आणि हलग्यांच्या कडकडात भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली.या मिरवणुकीत सावंत यांच्या नातेवाईक आणि इष्टमित्रांसह संपूर्ण सावंत गल्लीतील अठरापगड समाज सामील झाला. सावंत गल्लीतील मारुती मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक फुलसौंदर चौक-जय महाराष्ट्र चौक -गुजर गल्ली-छत्रपती शिवाजी महाराज चौक-दत्तपेठ – सुभाष चौक – किल्ला वेस, मारुती मंदिर आदी प्रमुख मार्गांवरून जात असताना शहरातील महीला भगिनींनी या बैलजोड्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दिला. सायंकाळी साडेपाच च्या सुमारास ही मिरवणूक पुन्हा सावंत यांच्या निवासस्थानासमोर आली. या ठिकाणी या बैलांचे पारंपारिक पद्धतीने लग्न लावले गेले. लग्नासह विविध पारंपारिक सोपस्कार पूर्ण केल्यानंतर सालाबाद प्रमाणे उपस्थित सर्वांसाठी सावंत कुटुंबीयांकडून पुरणपोळीच्या जेवणाचा बेत झाला.बैलपोळ्याच्या या संपूर्ण सोहळ्यात सावंत कुटुंबातील विठ्ठल आप्पा सावंत, गोपाळ बापू सावंत, दादासाहेब सावंत, भगवान नाना सावंत, ॲड. राहुल सावंत, माजी नगरसेवक संजय (पप्पू) सावंत, सुनील बापू सावंत, जनावरांचे व्यापारी किरण सावंत यांच्यासह सचिन गायकवाड, दादा इंदलकर, गोविंद किरवे, फारूख जमादार, दिपक सुपेकर, अल्लाउद्दिन शेख, हुमरान मुलाणी, सरपंच चंद्रकांत काळे, सरपंच दौलत वाघमोडे, गणेश मुरूमकर, चेअरमन विलास दळवी, विलास नलवडे, सरपंच धनंजय शिंदे, अशोक दोशी, व्यापारी संतोष गाडे (कुर्डू), सारंग ढवाण (काष्टी), सारंग भोसले (काष्टी), दासा मोडाळे (राशीन), मच्छिंद्र काळे (राशीन), संदीप जाधव (पाडळी), शिवाजी झिपे पेडगाव, जनाबापू कायगुडे पेडगाव, बाळू काटकर पेडगाव, विशाल गवळी पेडगाव, तुकाराम बालसिंग वाळकी, दामू थोरात यवत, वैभव तुले यवत, भारत मोडाळे राशिन, राजू तांबोळी ,दादा शेळके, बापू साळुंखे, बायू कुरेशी, गुलाम घोस, वजीर सय्यद, आण्णा कवितके आदी मान्यवरांसह सावंत गल्ली येथील अनेक जण उपस्थित होते.

मागील ७२ वर्षांपासून सावंत कुटुंबात बैलपोळा सण उत्साहाने साजरा केला जातो. यांत्रिकीकरणामुळे बैलांचा शेतीसाठी वापर कमी झाला असल्याने सहसा शेतकऱ्यांच्या गोठ्यात बैल दिसत नाही. शहरी भागात तर मातीच्या बैलांची पूजा करून बैलपोळा सण साजरा केला जातो. मात्र भावी पिढीला या परंपरागत सणाची ओळख राहावी म्हणून आम्ही जामखेड, गेवराई, राशीन, कुर्डूवाडी, काष्टी आदी भागातून उमद्या बैल जोड्या खरेदी करून पोळ्याच्या सण साजरा करतो.
– विठ्ठल आप्पा सावंत,
व्यापारी करमाळा.

हमालीचा व्यवसाय करता करता आमचे आजोबा स्व. अनंता आबा सावंत यांनी एका खोंडाची खरेदी करून जनावरांचा व्यवसाय सुरू केला. हा व्यवसाय आमचे वडील स्व. सुभाष अण्णा सावंत यांनी पुढे चालू ठेवला. स्व. आण्णा राजकीय व सामाजिक क्षेत्रात उतरल्यानंतर आमचे चुलते श्री. विठ्ठलआप्पा सावंत यांनी हा व्यवसाय पुढे चालवला. प्रामुख्याने शेतकऱ्यांची दिवाळी मानला गेलेला बैलपोळा हा सण बैलांअभावीच साजरा करण्याची प्रथा पडू नये म्हणून आम्ही दरवर्षी अनेक बैल जोड्या खरेदी करून बैल पोळा उत्साहात साजरा करतो.
– ॲड. राहुल सावंत.

आमचे वडील विठ्ठलआप्पा यांनी आसपासच्या बाजारपेठांत कर्नाटकातून सुद्धा देखण्या बैल जोड्या आणून त्यांची विक्री केली. सध्याच्या काळात केवळ हौस म्हणून बैल जोड्या क्वचित जोपासल्या जातात त्यामुळे हा व्यवसाय कमी झाला असला तरी आता केवळ दुभत्या जनावरांचा व्यवसाय जोमाने सुरू आहे.
– किरण सावंत व्यापारी

error: Don\'t try to copy. Content is protected !!