जिल्हा दिव्यांग अधिकारी दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची मुकबधीर शाळेला भेट दिव्यांग विद्यार्थ्यांसमवेत अधिकाऱ्यांचे जेवण
करमाळा प्रतिनिधी जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी पदाचा नुकताच पदभार स्वीकारलेले दक्षिण सोलापूरचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी करमाळा येथील मुकबधीर शाळेला अचानक भेट देत सामाजिक जाणिवेचे उदाहरण घालून दिले. त्यांनी थेट विद्यार्थ्यांसमवेत बसून जेवण केले. जिल्हा दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्यासाठी कोणी इच्छुक नसल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी पंधरा दिवसांपूर्वी ही जबाबदारी राऊत यांच्याकडे सोपवली होती. ही जबाबदारी स्वीकारत त्यांनी दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार केला आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्ह्यातील दिव्यांग शाळांना पूर्वसूचना न देता अचानक भेटी देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या भेटींतून शाळांमधील भौतिक सुविधा, शैक्षणिक दर्जा, विद्यार्थ्यांचा आहार, उपस्थिती तसेच एकूण व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली जात आहे.गुरुवारी सायंकाळी सहा वाजता त्यांनी करमाळा तालुक्यातील देवीचा माळ येथील कमला भवानी मुकबधीर शाळेला अचानक भेट दिली. त्यावेळी ८८ दिव्यांग विद्यार्थी जेवण करत असताना त्यांनी पाहिले. ‘मी अधिकारी आहे’ हा विचार बाजूला ठेवून राऊत यांनी विद्यार्थ्यांसोबत जमिनीवर बसून त्यांच्या ताटात असलेलेच जेवण घेतले.यावेळी बोलताना राऊत म्हणाले, “दिव्यांग विद्यार्थ्यांना दर्जेदार सुविधा मिळाल्याच पाहिजेत, यासाठी आम्ही आग्रही राहणार आहोत. दिव्यांगांचे सक्षमीकरण हे शासनाचे धोरण असून त्याची प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणी करणे ही आमची जबाबदारी आहे.”


