कुणबी दाखल्यांसाठी सकल मराठा समाजाचे निवेदन प्रमाणपत्र प्रक्रियेत अडचणींबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

करमाळा प्रतिनिधी:
कुणबी जात प्रमाणपत्र मिळविण्याच्या प्रक्रियेत अनावश्यक अडथळे आणले जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना, सकल मराठा समाज, करमाळा यांच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, कुडूवाडी येथील प्रांताधिकारी कार्यालयाकडून कुणबी दाखल्यांच्या प्रकरणांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे आणले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. अर्जदाराने प्रतिज्ञापत्रावर स्वतः सही करून सादर केलेली ‘सेल्फ-अटेस्टेड’ कागदपत्रे कारण न देता नाकारली जात आहेत.
एकाच कुटुंबातील एका सदस्यासाठी तहसीलदारांनी प्रमाणित केलेली कागदपत्रे स्वीकारली जात असताना, त्याच कुटुंबातील दुसऱ्या सदस्यासाठी ओरिजनल कागदपत्रांची मागणी करून अडथळे आणले जात आहेत. तसेच, कुटुंबात आधीपासून जात पडताळणीसाठी वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असतानाही त्याची दखल घेतली जात नसल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, करमाळा तहसील कार्यालयातून कुडूवाडी प्रांत कार्यालयाकडे पाठवलेली प्रकरणे त्रुटी दाखवून परत पाठवली जात असल्यास, ती फेरसादर करताना तहसीलदारांची सही घेऊन करमाळ्यातूनच ऑनलाइन सादर करण्याची सुविधा दिली जावी. अन्यथा, अर्जदारांना वित्तीय व शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागेल.यावेळी माऊली पवार, सचिन काळे, दादासाहेब तनपुरे, दीपक गायकवाड, उमेश काळे आदी मराठा बांधव उपस्थित होते आणि त्यांनी समाजाच्या वतीने तातडीने कारवाई करण्याची मागणी केली.


